‘गुगल प्लस’ ‘मायनस’

‘फेसबुक’च्या वाढत्या लोकप्रियतेला स्पर्धा निर्माण करण्याच्या उद्देशाने गुगलने सुरू केलेल्या ‘गुगल प्लस’ या सोशलसाइटला कंपनीने ‘मायनस’ करण्याचे ठरवले आहे! म्हणजेच ‘गुगल प्लस’चे आता स्वतंत्र अस्तित्व राहणार नसून ‘गुगल’च्या अन्य उत्पादनातच त्याचा समावेश केला जाईल. 



‘गुगल प्लस’ ही आत्तापर्यंत सोशल नेटवर्किंग साइट असल्याने त्याची वेगळी टीम कार्यरत होती. गुगलच्या अन्य सेवांमध्येच ‘गुगल प्लस’ हा आणखी एक प्लॅटफॉर्म म्हणूनच चालवला जाणार आहे. 


‘गुगल प्लस’चे प्रमुख गुंडोट्रा यांनी गुगलला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कंपनीने ‘गुगल प्लस’चे स्वतंत्र अस्तित्व संपवण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या अन्य उत्पादनांचा वापर करताना ‘गुगल प्लस’शी जोडून घेण्याची सक्ती ग्राहकांवर केली जात असे. हे बंधन शिथिल करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘गुगल प्लस’ला किती महत्त्व उरेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नव्या निर्णयामुळे ‘गुगल प्लस’साठी इतके मनुष्यबळ वापरण्याची गरज कंपनीला उरलेली नाही. त्यामुळे ‘गुगल प्लस’ची पूर्ण टीम मोडित काढली जाईल. ‘कोअर टीम’मधील उपयुक्त ठरणारे कर्मचारी ‘अॅण्ड्रॉइड टीम’मध्ये समाविष्ट केले जातील. 

Exit mobile version