गूगल – माहितीचं एक साम्राज्य ! – बोर्डरूम

आज जगात जो कोणी इंटरनेटशी जोडला गेला आहे, त्या प्रत्येकालाच गूगल माहित आहे. गूगलने ज्या काही सेवा-सुविधा पुरवल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसे इंटरनेटशी जोडली गेली आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. गूगल ही लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भागच बनली आहे. गूगलचे ‘सर्च इंजिन’ हे जगात सर्वात प्रभावी मानले जाते. आपण गूगलच्या सर्च इंजिनचा वापर करून आपल्याला हवी असलेली कोणतीही माहिती क्षणार्धात मिळवू शकतो. अशा तऱ्हेने गूगलने माहितीचा खजिनाच लोकांना उपलब्ध करून दिला आहे. ज्या काळात मायक्रोसॉफ्ट, अॅपल, IBM सारख्या बलाढ्य कंपन्या ‘सॉफ्टवेअर-हार्डवेअर तंत्रज्ञान’ क्षेत्रात जम बसवून होत्या, तेव्हा गूगल नवख्या असलेल्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ प्रणालीचा उपयोग करून तंत्रज्ञान क्षेत्रात जम बसवू पाहत होती. गुगलने बुद्धिमत्ता, सर्जनशीलता यांची सांगड घालत लोकांच्या गरजांचा विचार करून अतिशय नाविन्यपूर्ण सेवा, उत्पादने जगात आणली आहेत. म्हणुनच एकेकाळी गॅरेजमधून सुरुवात केलेल्या या कंपनीचा सध्या जगातील सर्वात प्रभावशाली कंपन्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे गुगलची वाटचाल जाणून घेणे हे नक्कीच रोमांचकारक ठरेल.

लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन 

कॅलिफोर्नियातील ‘स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी’ ही उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जगात प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणांहून अतिशय बुद्धिमान विद्यार्थी विविध क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी येतात. असेच १९९५ साली, पीएचडी करण्यासाठी विद्यार्थ्यांची एक नवी तुकडी (बॅच) स्टॅनफोर्डमध्ये दाखल झाली होती. यामधील एका तुकडीमध्ये लॅरी पेज होता. कॉलेजमध्ये नुकतेच पदार्पण केलेल्या या विद्यार्थ्यांना पीएचडीबद्दल माहिती देण्याची, कॉलेजचा परिसर दाखवण्याची आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी कळवण्याची जबाबदारी पीएचडी च्या ‘दुसऱ्या वर्षातील’ विद्यार्थ्याकडे असते. तेव्हा लॅरी पेज असलेल्या तुकडीची जबाबदारी सर्गे ब्रिनकडे होती. येथेच त्या दोघांची पहिल्यांदा भेट झाली. या दोघांची व्यक्तिमत्वे ही पूर्णपणे विरुद्ध होती. लॅरी पेज हा बुजरा, अबोल आणि अंतर्मुख होता तर सर्गे ब्रिन हा धाडसी, बोलका आणि बहिर्मुख होता. सुरुवातीला दोघांनाही एकमेकांबद्दल तिरस्कार वाटत होता, पण नंतर एकमेकांसोबत वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा केल्यावर ते एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आदर करू लागले. त्यांना असे लक्षात आले कि त्यांच्या आवडी-निवडी देखील सारख्याच होत्या आणि अशा पद्धतीने ते चांगले मित्र बनले.
स्टॅनफोर्डमध्ये दाखल झाल्यावर लॅरी पेजने ‘टेरी विनोग्रॅड’यास पीएचडीसाठी सल्लागार म्हणून निवडले. पीएचडीसाठी आवश्यक असलेल्या प्रबंधासाठी लॅरी वेगवेगळ्या विषयांचा शोध घेत होता. तो याबाबत खूपच दक्ष होता. त्याने मेहनत घेऊन काही नवीन कल्पना शोधल्या होत्या. त्याकाळी ‘वर्ल्ड वाईड वेब’ (WWW) या प्रणालीचा नुकताच शोध लागला होता आणि त्याचा वापर देखील वाढत चालला होता. लॅरी याकडे आकर्षित झाला होता. ‘वर्ल्ड वाईड वेब’ म्हणजे माहितीचे जाळे जे हायपरलिंकच्या सहाय्याने एकमेकांशी जोडलेले असते. आणि आपण इंटरनेटच्या मदतीने त्याचा वापर करू शकतो. ‘वर्ल्ड वाईड वेब’ मधील माहिती ही वेब पेजेसच्या (डॉक्युमेंट्स) स्वरुपात असते. या डॉक्युमेंटचे पुन्हा विविध प्रकार असतात. उदाहरणार्थ. साधे लेख, व्हिडिओ, ऑडीओ, चित्रे. या प्रत्येक वेबपेजला एक वैयक्तिक पत्ता (Uniform Resource Locator) असतो. लॅरी ‘वर्ल्ड वाईड वेब’चा अभ्यास करण्यास खूप उत्साही होता. तेव्हा लॅरीने त्याच्या सल्लागाराशी चर्चा करून हाच विषय पीएचडीसाठी निवडला.
संशोधन करत असताना त्याच्या असे लक्षात आले की एका वेबपेजवरून पुढे दुसऱ्या वेबपेजकडे जाणाऱ्या लिंक्स शोधणे (forward linking) हे सोपे आणि कमी महत्त्वाचे आहे. पण एखाद्या वेबपेजला मागे कोणकोणत्या वेबपेजेसनी लिंक केलेले आहे (backward linking) हे सांगणे कठीण आणि महत्वाचे आहे. संशोधक जेव्हा प्रबंध प्रकाशित करतो, तेव्हा त्याची गुणवत्ता ठरवताना फक्त अस्सलपणावर अवलंबून न राहता ‘अवतरण’ (citation/quotation) चा देखील विचार करावा लागतो. ‘अवतरण’ म्हणजे अशी पद्धत ज्यामध्ये प्रबंधाच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचताना इतर उपयोगात आलेल्या माहितीचा, प्रबंधांचा संदर्भ दिलेला असतो. एखाद्या प्रबंधाचे परीक्षण हे त्या विषयाची कल्पकता, अस्सलपणा तसेच प्रबंधामध्ये समावेश करण्यात आलेल्या इतर प्रबंधांचे संदर्भ, इतर प्रबंधांमध्ये करण्यात आलेला त्या प्रबंधाचा संदर्भ आणि प्रत्येक संदर्भाचे मोल यावरून ठरविली जाते. संशोधनाच्या जगात ‘citation’ ला खूप महत्व आहे. त्यामुळे लॅरी पेज ‘बॅकवर्ड लिंकिंग’ वर संशोधन करू लागला आणि या प्रोजेक्टला त्याने ‘बॅकरब’ असे नाव दिले. यासाठी लॅरी पूर्ण वेबच डाऊनलोड करू पाहत होता. आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याला प्रबळ संगणकीय संसाधनांची आवश्यकता होती. प्रोजेक्टचा अवघडपणा व आवाका पाहून सर्गे ब्रिनदेखील याकडे आकर्षित झाला. आता दोघे मिळून दिवस-रात्र प्रोजेक्टवरती काम करत असत.

त्यांनी ‘citation’ ची संकल्पना वापरून प्रत्येक वेबपेजला एक दर्जा (रँक) दिला. एखाद्या वेबपेजचा दर्जा त्यांनी त्याला मागे किती वेबपेजेसनी लिंक केलेले आहे, पुन्हा त्या लिंक केलेल्या वेबपेजेसना मागे लिंक केलेल्या वेबपेजेसची संख्या अशापद्धतीने एकमेकांशी जोडलेल्या लिंक्सची संख्या आणि त्या वेबपेजचे अस्तित्व यांवरून ठरवली. या सर्व गोष्टी खूपच गुंतागुंतीच्या होत्या आणि त्यासाठी अतिशय उच्च दर्जाचे गणित लागणार होते. सर्गे ब्रिन हा गणितात विद्वान होता. त्याच्या मदतीने लॅरीने हे काम पार पाडले. ’बॅकरब’मध्ये एखाद्या वेबपेजचा पत्ता (URL अॅड्रेस) दिल्यावर त्या वेबपेजला मागे जोडलेल्या वेबलिंक्सची, वेबलिंक्सच्या दर्जानुसार यादी मिळत असे. अशा पद्धतीने त्यांच्या नकळतच त्यांनी ‘वेब क्रॉलर’ तयार केले होते. ‘वेब क्रॉलर’ म्हणजे एक असा प्रोग्राम ज्याच्या मदतीने वेबवरील सर्व पेजेसना भेट देऊन त्यांचा मजकुर तसेच जोडलेल्या लिंक्स आणि काही इतर गोष्टींच्या आधारावर वेब पेजेसची अनुक्रमणिका (indexing) ठरवतात. त्यानंतर काही काळ चाचणी केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले कि ’बॅकरब’ चा इंटरनेट सर्चमध्ये अतिशय महत्वाचा उपयोग होऊ शकतो. 
त्याकाळी आर्की (Archie), वेरोनिका (Veronica), एक्साईट (Excite), अल्टाविस्टा (Altavista) हि सर्च इंजिन प्रसिद्ध होती. सर्च करण्यासाठी हि इंजिन्स फक्त वेबपेजेसवरील सर्च केलेल्या वाक्यातील शब्दांची वारंवारता (frequency of keywords) लक्षात घेत असत. म्हणजे जर आपण एखादे वाक्य सर्च केले, तर ज्या वेबपेजवर त्या वाक्यातील जास्तीत जास्त शब्द जास्तीत जास्त वेळा आढळतील ते वेबपेज रिझल्टमध्ये पहिल्या क्रमांकाला असेल आणि त्याच्या पेक्षा कमी वारंवारपणा असलेले वेबपेज त्याच्या खाली अनुक्रमे मिळत. वेबवरती सर्च करण्यासाठी ते दुसऱ्या कोणताच घटकावर अवलंबून नसत. त्यामुळे ’बॅकरब’मुळे अर्थातच चांगले रिझल्ट मिळणार होते. त्यांनी पारंपारिक सर्च इंजिनच्या आणि ’बॅकरब’च्या वैशिष्ट्यांना जोडण्यासाठी एक नवा अल्गोरिदम तयार केला. हा अल्गोरिदम ‘पेजरँक’ म्हणून ओळखला जातो. या सर्च इंजिनमध्ये जेवढे जास्त वेबपेज शोधायचे असतील तेवढा चांगला रिझल्ट मिळत जातो. 
गूगलचं सर्वात पहिलं होमपेज
आता या नव्याने तयार केलेल्या सर्च इंजिनसाठी ते नाव शोधत होती. त्यांनी ‘द व्हॅाटबॉक्स’ (The Whatbox) जे नाव जवळपास निश्चितच केले होते पण शेवटी त्यांनी ‘गूगोल’ (googol) या शब्दापासून प्रेरणा घेऊन ‘गूगल’ (Google) हे नाव सर्च इंजिनला दिले, ‘गूगोल’ म्हणजे १ च्या पुढे १०० शून्य एवढी मोठी संख्या. १९९६ साली त्यांनी ‘गूगल’ हे सर्च इंजिन कॉलेजच्या सर्व्हरचा वापर करून लोकांसाठी खुला केला. काही कालावधीतच तो प्रसिद्ध झाला. पण ’बॅकरब’ प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या संगणकीय संसाधनांची क्षमता वाढतच चालली होती, आणि हा प्रोजेक्ट चालू ठेवण्यात त्यांचा खूप वेळ जात असे. त्यांना ‘पीएचडी’चे शिक्षण देखील पूर्ण करायचे होते, तसेच त्यांना इतर कंपन्यांकडून त्यांचे संशोधन विकत घेण्याच्या चांगल्या ऑफरदेखील येत होत्या. पण त्या दोघांना या प्रोजेक्टमध्ये खूपच रस होता, त्यामुळे ‘पुढचे पुढे बघू’ या विचाराने त्यांनी सर्व ऑफर नाकारल्या. आता लॅरी आणि सर्गेला त्यांनी केलेल्या असामान्य संशोधनाची जाणीव झाली होती आणि ते स्वतःचीच कंपनी काढण्याच्या विचार करत होते. १५ सप्टेंबर, १९९६ साली google.com हे डोमेन नेम सर्च इंजिनसाठी नोंदण्यात आले. यावेळी नाव नोंदवताना झालेल्या चुकीमुळे गूगलला गूगल हे नाव मिळालंय! गूगल हे आजूबाजूच्या वर्तुळात आणि शैक्षणिक संशोधन क्षेत्रात प्रसिद्ध होतच चालले होते. एकदा असेच १९९८ साली ‘सन मायक्रोसिस्टिम्स’ चा सह-संस्थापक अॅंडी जेव्हा स्टॅनफोर्डमध्ये आला होता त्यावेळी गूगलची किमया पाहून तो भारावून गेला. तेव्हा संगणकीय संसाधनांच्या कमतरतेमुळे गूगल सर्च रिझल्टवर मर्यादा येत होत्या. म्हणून गूगल सर्च इंजिन विकसित करण्यासाठी त्याने १,००,००० डॉलर चा चेक ‘Google Inc’ या अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावे लिहिला. आता या चेकचा वापर करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे त्यांनी ४ सप्टेंबर, १९९७ साली ‘Google Inc’ कंपनी नोंद केली आणि बँकेच्या खात्यात पैसे जमा केले. 
गूगलचं सर्वात पहिलं डूडल! 
त्यानंतर त्यांनी कॅलीफोर्नियातील एका गॅरेजमध्ये स्थलांतर केले. काम वाढत चालल्यामुळे, त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना कंपनीमध्ये घेण्यास सुरुवात केली. ‘गूगल’ हे इतर सर्च इंजिनच्या तुलनेने अधिक चांगले रिझल्ट देत असल्यामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळत चालली होती. त्यानंतर त्यांनी कॅलीफोर्नियातील माउंटेन व्हयू भागात स्थलांतर केले. त्याकाळी इतर कंपन्यांमध्ये फक्त कामाला केंद्रबिंदू मानणारी कॉर्पोरेट संस्कृती होती. गूगलने मात्र कामाला महत्त्व देतानाच कर्मचाऱ्यांना काम करताना आरामदायी वाटेल, त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल अशी संस्कृती तयार केली. १ एप्रिल,२००० ला गूगलने ‘मेंटलप्लेक्स’ हि सुविधा सुरु केल्याचे सांगून लोकांना ‘एप्रिल फुल’ बनवले. त्याची जाहिरात देखील खूप मजेशीर होती. ‘मेंटलप्लेक्स ही एक अशी टेक्नोलॉजी आहे कि ज्यामध्ये ब्रेनवेव्हचा वापर होतो. त्यामुळे तुम्हाला जे काही शोधायचे आहे ते सर्च टाईप करण्याची गरज पडणार नाही.’, असे सांगतले होते. यामध्ये लोकांना टोपी, चष्मा अशा गोष्टी काढून टाकून पडद्यावरील वर्तुळाकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगत. लक्ष देत असतानाच तुम्हाला जे काही शोधायचे आहे त्याचा विचार करण्यास सांगत, कि ज्यामुळे ‘मेंटलप्लेक्स’ तुमच्या मनातले ओळखून रिझल्ट देईल. तेव्हा बऱ्याच लोकांना हे खरेच वाटले होते. गूगलने यानंतरदेखील बऱ्याचवेळा लोकांना ‘एप्रिल फुल’ बनवले. २००० पर्यंत गूगल सर्च इंजिन हे १५ भाषांमध्ये उपलब्ध होते. सध्या ते १५० पेक्षा अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. याच दरम्यान त्यांनी लोकांना गूगल होमपेज वर न जाता कोणत्याही वेबपेज वरून गूगल सर्च इंजिन वापरण्यासाठी ‘गूगल टूलबार’ हे ब्राउझरसाठी प्लग-इन (plug-in) तयार केले. तसेच जर एखाद्या दिवशी जर काही महत्वपूर्ण घटना किंवा प्रसंग घडला असेल, तर त्याला अनुसरून गूगलच्या होमपेज वरील लोगोमध्ये बदल केले जात, आणि या नवीन लोगोंना ‘गूगल डूडल’ असे नाव दिले. अशा पद्धतीने गूगलने नवनवीन गोष्टी प्रदान करायला चालू केल्या होत्या… 
‘एप्रिल फुल’साठी ‘गूगल मेंटलप्लेक्स’ची युक्ती
२००० पर्यंतच गूगल सर्च इंजिनमध्ये दररोज २०० लाखापेक्षा जास्त प्रश्न विचारले जात असत. सध्या गूगल दररोज ३.५ अब्जावधी प्रश्नांना हाताळते. गूगल सर्च इंजिनची सेवा मोफत होती, पण कंपनी चालू ठेवण्यासाठी भांडवल जमा करणे आवश्यक होते. तेव्हा लॅरी आणि सर्गेने ऑनलाईन जाहिरातीतून भांडवल जमा करण्याचे ठरवून ‘गूगल अॅडवर्ड्स’ (Google AdWords) ही नवीन सुविधा चालू केली. सुरुवातीला त्यांनी CPM (cost per mille) संकल्पना वापरली, तसेच ‘बॅनर अॅड’मुळे साईटवर भर येऊ नये आणि वापरकर्त्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळावेत म्हणून फक्त ‘मजकूर आधारित जाहिरात’ (Text based ads) दाखवण्याचे ठरवले. तसेच जाहिरात ही वापरकर्ता काय शोधत आहे यावर अवलंबून असे. CPM म्हणजे अशी संकल्पना कि ज्यामध्ये सुरुवातीपासूनच जाहिरातीचा दर ठरवलेला असतो, आणि त्यानुसार पैसे मिळतात. म्हणजे जर एखाद्या जाहिरातीसाठी १००० व्ह्यूजसाठी काही पैसे ठरवली असतील, तर जेव्हा त्या जाहिरातीला १००० व्ह्यूज मिळतील, तेव्हाच पैसे मिळतात. याच्या अगोदरदेखील १९९९ च्या शेवटी, गूगलने काही प्रमाणात ‘मजकूर आधारित जाहिरात’ दाखवण्याचे चालू केले होते, पण यातून फार कमी भांडवल जमा झाले होते.
पण जेव्हा २३ ऑक्टोबर, २००० साली ‘गूगल अॅडवर्ड्स’ सेवा चालू करण्यात आली तेव्हा गूगलकडे ऑनलाईन जाहिरातीसाठी फक्त ३५० ग्राहक होते. २००१ पर्यंत यापासून गूगलकडे ८५ लाख डॉलर भांडवल जमा झाले होते. पण त्याच वेळी Overture या कंपनीकडे ऑनलाईन जाहिरातीमार्फत २८८ लाख डॉलर भांडवल जमा झाले होते. Overtureची सुविधा CPC (cost per click – जर युजरने जाहिरातीवर क्लिक केले तरच पैसे मिळतात, आणि प्रत्येक क्लिकसाठी दर ठरवलेला असतो) संकल्पनेवर आधारित होती.  Overture च्या या मॉडेलमध्ये ग्राहकाकडून जास्त पैसे घेऊन त्यांची बिझीनेसची जाहिरात जास्त वेळा लोकांच्या नजरेत दिसेल, अशी दाखवण्याची सुविधा होती. कारण जेवढ्या जास्त लोकांना जाहिरात दिसेल, तेवढी जास्त बिझनेसची प्रसिद्धी होणार आणि नवीन ग्राहक मिळणार. पण Overture च्या या मॉडेलमध्ये काही त्रुटी होत्या. जर अशीच एखादी जास्त पैसे देऊ केलेली जाहिरात वेबपेजवरती सर्वात वरच्या बाजूला असेल आणि युजरने काही वेगळेच सर्च केले असेल (म्हणजे युजरचा जाहिरातीमध्ये काहीच रस नसेल) तर युजर त्या जाहिरातीवरती क्लिक करणार नाही याची जास्त शक्यता होती. पण त्यामुळे कोणाचाच फायदा होत नव्हता. हीच त्रुटी ओळखून गूगलने २००२ साली CPC वर आधारित ‘गूगल अॅडवर्ड्स’ची पुढची आवृत्ती बाजारात आणली. तेव्हापासून ही सुविधा जाहिरातदारांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. सध्या गूगलला यामधूनच सर्वात जास्त भांडवल मिळते. 
पण याआधी या सर्व सेवा-सुविधा तयार करण्यासाठी आणि बाजारात आणण्यासाठी गूगलला भांडवल जमा करणे आवश्यक होते. त्यामुळे लॅरी आणि सर्गे यांनी गुंतवणूकदारांची भेट घेण्यास सुरुवात केली. त्यांना एका गुंतवणूकदाराकडून २५ मिलिअन डॉलरचे भांडवल मिळाले, पण त्यावेळेस लॅरी आणि सर्गे या बिझीनेसमध्ये नवीन असल्यामुळे त्याने एखाद्या अनुभवी व्यक्तीला ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ (CEO) निवडण्याचे सांगितले. सुरुवातीला लॅरी या निर्णयास राजी नव्हता. पण शेवटी त्यांनी सीईओ शोधण्यास सुरुवात केली. त्यांनी बऱ्याच कंपन्यांच्या सीईओना भेट दिली, याच दरम्यान त्यांची भेट स्टिव जॉब्ज सोबत झाली होती. ते दोघेही स्टिव जॉब्जच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले होते आणि त्यांना स्टिव जॉब्जने गूगलचा सीईओ व्हावे असे वाटत होते. याबद्दल त्यांनी स्टिवला विचारले , मात्र स्टिव जॉब्जने यांस नकार दिला. शेवटी त्यांनी ‘एरिक श्मिट’ (Erik Schmidt) यास सीईओ म्हणून निवडले. आता एरिक श्मिट कंपनीची वाढ कशी करता येईल, अधिक भांडवल कसे जमा करता येईल, मॅनेजमेंट यांसारख्या गोष्टी सांभाळत असे. तर लॅरी आणि सर्गे हे सध्याच्या सुविधा आणखी कशा पद्धतीने सुधारता येतील, कोणती नवीन प्रोजेक्ट चालू करायला हवा यांसारख्या तांत्रिक गोष्टी हाताळत असत. त्यानंतर काही काळातच गूगलने ‘गूगल इमेज’ सेवा चालू केली कि ज्याद्वारे इमेज सर्च करता येते आणि गूगलची भरभराट होतच गेली.  
अशा पद्धतीने गूगल नेहमीच ज्या सेवा देत आले आहे, त्यामध्ये अधिक सुधारणेसाठी प्रयत्न करत आले आहे. गूगलने लोकांच्या गरजांचा विचार करून नेहमीच नाविन्यपूर्ण सेवा पुरवल्या. ‘गूगल डॉक्स’, गूगल मॅप्स, ‘गूगल ड्राईव्ह’, ‘जीमेल’, ’गूगल नाऊ’, ‘गूगल फोटोज’, ’गूगल ड्यूओ’, ‘गूगल क्रोम’ यांसारख्या इंटरनेटशी संबंधित अनेक सुविधा याची उदाहरणे आहेत. त्याकाळी ज्या मोफत मेल सेवा पुरवल्या जात त्यामध्ये युजरला जास्तीत जास्त फक्त १० MB पर्यतचा डेटा मोफत ऑनलाईन स्वरुपात संचय करता येत असे. पण जीमेलमध्ये सुरुवातीलाच १ GB डेटा ऑनलाईन स्वरुपात संचय करण्यासाठी सोय केली होती. सध्या याची लिमिट १७ GB आहे. तसेच त्याकाळी गाजत चालेल्या अनेक सुविधा त्यांनी विकत घेतल्या, आणि त्यामध्ये सुधारणा केल्या. गूगलने ‘युट्यूब’, ‘ब्लॉगर’, ‘where 2 technologies’, ‘अँड्रॉइड’ यांसारख्या कंपन्या विकत घेतल्या आणि त्यांमध्ये भरपूर सुधारणा केल्या. गूगलचा मुख्य बिझीनेस हा इंटरनेटशी संबंधित असलेल्या सेवा पुरवण्यामध्ये असला तरी मोबाईल ऑपेरेटिंग सिस्टीम आणि हार्डवेअर क्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न करत आहे. अँड्रॉइड कंपनीला विकत घेऊन गूगलने मोबाईल OS क्षेत्रात चांगलाच जम बसवला आहे. मात्र मोबाईल हार्डवेअर क्षेत्रात जम बसवण्यासाठी गूगलने मोटोरोला ही कंपनी विकत घेतली पण त्यात नुकसान झाले आणि शेवटी गूगलने मोटोरोला कंपनी लेनोवोला विकली. अशा प्रकारे गूगलला काही क्षेत्रात भरपूर यश मिळाले आहे तर काही क्षेत्रात अपयशाला सामोरे जावे लागले आहे. पण गूगलने नेहमीच नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून विविध क्षेत्रात जम बसवण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेदेखील करेल.

२०११ मध्ये लॅरी पेज पुन्हा एकदा CEO झाला आणि त्याने कंपनीच्या व्यवस्थापनात अनेक बदल केले. चांगल्या पद्धतीने कामाचे व्यवस्थापन करता येण्यासाठी २०१६ साली ‘अल्फाबेट’ ही नवीन कंपनी तयार केली. सध्या ‘गूगल’ ही ‘अल्फाबेट’ कंपनीचा एक भाग आहे. अल्फाबेटमध्ये विविध प्रकारची कामे ही त्या कामानुसार संबंधित विभाग हाताळते. जेव्हा या कंपनीची घोषणा करण्यात आली होती तेव्हा ‘गूगल’चे म्हणजेच ‘अल्फाबेट’ या पेरेंट कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढली होती आणि त्यातून त्यांना २० बिलीयन डॉलरचा फायदा झाला होता. 

एरिक श्मिट (कार्यकारी अध्यक्ष – अल्फाबेट)  
अल्फाबेट कंपनी गूगल (सर्च इंजिन आणि इतर मूळ सेवांसंबंधी काम करते), कॅलीको (Calico – आरोग्यासंबंधित विषयांवर काम करते), गूगल एक्स (नाविन्यपूर्ण प्रोजेक्टवर काम करते), गूगल फायबर ( स्पीड इंटरनेट पुरवण्यासंबंधित प्रश्नांवर काम करते), गूगल कॅपिटल (नवीन टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट संबंधित काम करते), गूगल व्हेंचर्स (नवीन कंपन्यांना भांडवल पुरवण्याचे काम करते) आणि नेस्ट (स्मार्ट घरघुती उपकरणे तयार करते) या कंपन्यांवर नियंत्रण ठेवते. या प्रत्येक कंपनीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती निवडण्यात आला आहे. सध्या लॅरी पेज अल्फाबेट कंपनीचे सीईओ आहेत, सर्गे ब्रिन अध्यक्ष (President) आहेत आणि एरिक श्मिट हे कार्यकारी अध्यक्ष (Executive Chairman) आहेत. 
गूगलचे सध्याचे सीईओ सुंदर पिचाई
सुंदर पिचाई यांची गूगलच्या सीईओ पदी नेमणूक केली आहे. सुंदर पिचाई यांनी याअगोदर गूगल टूलबार, गूगल ड्राइव्ह, प्ले स्टोअर, क्रोम OS, गूगल मॅप्स, गूगल क्रोम ब्राउझर, क्रोमबुक, क्रोम OS, अँड्रॉइड यांवर काम केले आहे. त्यांच्या काळात या सर्वांची लोकप्रियता आणि वापर खूपच वाढला होता. सुंदर पिचाई यांचे व्यावहारिक चातुर्य, प्रगतीतील सातत्य आणि कामाबाबत, कंपनीबाबतची निष्ठा या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची गूगलच्या सीईओपदी नेमणूक करण्यात आली. मायक्रोसॉफ्ट, अॅपल प्रमाणे गूगल कंपनीचे कोणी एक व्यक्ती प्रतिनिधीत्व करत नाही. त्यामुळे गूगलचे यश हे कोण्या एका व्यक्तीमुळे नसून ते अतिशय बुद्धिमान, सर्जनशील कर्मचार्‍यांमुळे आहे. 
गूगलला सर्वात जास्त भांडवल हे जाहिरातींमधून मिळते. येत्या काळात लोक सर्च करण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा वापर न करता ‘व्हॉइस असिस्टंट’चा (वैयक्तिक सहाय्यक अॅप) उपयोग करतील. त्यामुळे साहजिकच लोकांना जाहिरात दाखवता येणार नाही आणि जाहिरातींमधून मिळणारे भांडवल कमी होईल. यासाठी गूगल उत्पन्नाचे नवे मार्ग शोधत आहे आणि प्रामुख्याने हार्डवेअर आधारित सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, ‘गूगल पिक्सेल’ हा मोबाईल, प्रोजेक्ट Fi (वायरलेस सेवा पुरवण्यासंबंधीत एक प्रकल्प), ड्रोन, व्हीआर हेडसेट ही याचीच काही उदाहरणे आहेत. 
गूगल सामाजिक सुधारणेसाठीदेखील प्रयत्न करते. सध्याच गूगलने लोकांना इंटरनेटशी जोडता यावे यासाठी काही ठराविक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध केली आहे. गूगल नवीन कंपन्यांच्या (Startup) उभारणीसाठी मदत करते, तसेच विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी यासठी विविध उपक्रम घेते. सध्या गूगलचे ८५.५ बिलीयन डॉलर एवढे मूल्य (नेट वर्थ) आहे. २०१६ च्या फोर्ब्जच्या यादीनुसार गूगलचा जगातील सर्वात प्रभावशाली ब्रॅन्ड्समध्ये दुसरा क्रमांक येतो. यामध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आहे. गूगल वापरण्याचे काही तोटेदेखील आहेत. आपण दररोज गूगलच्या सेवा वापरतो, त्यानुसार चांगल्या जाहिरात दाखवण्यासाठी आपली सर्व माहिती गूगलच्या डेटाबेसमध्ये स्टोर होते आणि ही माहिती जर दुसऱ्या ग्रुपच्या हाती लागली तर ते लोकांच्या गोपनीयतेसाठी सुरक्षित ठरणार नाही. गोपनीयता न पाळल्याचे आरोपसुद्धा गूगलवर बर्‍याच वेळा करण्यात आले आहेत. तसेच गूगलमुळे एखाद्या विषयासंबंधी खोटी माहितीसुद्धा पसरवली जावू शकते. त्यामुळे माहितीचा खरेपणा ओळखण्यावर ते सध्या काम करत आहेत.
गूगलचं मुख्यालय

‘माहितीचे व्यवस्थितपणे व्यवस्थापन करून सर्व लोकांना ते उपलब्ध करून देणे’ हे गूगलचे ध्येय आहे आणि त्यासाठी गूगल कठोर मेहनत घेत आहे. सध्या गूगल सर्च इंजिनएवढे चांगले रिझल्ट कोणतेच सर्च इंजिन देत नाही. इतर सर्च इंजिनच्या मानाने गूगल खूप पुढे आहे पण खूद्द लॅरी पेजच्या मते गूगल उत्तम सर्च इंजिनच्या तुलनेने बरेच मागे आहे. २०१३ मध्ये एकदा गूगलच्या सर्व सेवा २-३ मिनिटांसाठी बंद पडल्या होत्या. तेव्हा जगातील नेटवर्क ट्रॅफिक हे ४०% नी कमी झाले होते आणि गूगलच्या सेवांवर अवलंबून असलेल्या लोकांचे भरपूर नुकसान झाले होते. त्यामुळे सध्या जर कायमस्वरूपी गूगलच्या सेवा बंद करण्यात आल्या, तर पुढे काय होईल याची कल्पना करवत नाही.

लेखक : कौस्तुभ शिंदे (Kaustubh Shinde)

संदर्भ लिंक्स – 
१) गूगलच्या सर्व सुविधा –  en.wikipedia.org/wiki/List_of_Google_products
२) गूगल कंपनीसंबंधित माहिती – www.google.co.in/about/company/
३) गूगल सर्च इंजिनचे वर्किंग – www.google.co.in/insidesearch/howsearchworks/thestory/ 
४) गूगलच्या भविष्यातील योजना – www.ted.com/talks/larry_page_where_s_google_going_next
पुस्तके  
I) The Google Story (written by David Vise) 
II) The Google Boys : Sergey Brin and Larry Page In Their Own Words (edited by George Beahm)

(सदर लेखात काही चुकीची माहिती आढळल्यास किंवा लेखामध्ये काही बदल हवा असल्यास आम्हाला कळवा. तसेच तुम्हाला कोणत्या टेक गुरु बद्दल माहिती हवी आहे ती कमेंट बॉक्स मध्ये किंवा इमेलने कळवा. तुमच्या अभिप्रायाबाबत नक्कीच विचार केला जाईल.)incoming search terms : Google Information in marathi Sergey Brin Larry Page Eric Schmidt Sundar Pichai Alphabet Android Chrome PageRank Nest

Exit mobile version