साध्या चित्रांना फोटोत रूपांतरित करणारं Nvidia चं भन्नाट AI सॉफ्टवेअर!

एनव्हीडियाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून साध्या रेघोट्या ओढून काढलेल्या चित्रांना अगदी खर्‍याखुर्‍या फोटोंमध्ये रूपांतर करणारं सॉफ्टवेअर बनवलं आहे. GauGan नाव असलेल्या या सॉफ्टवेअरमधील स्मार्ट पेंट ब्रश आउटलाइन काढण्यासाठी वापरता येईल त्यानंतर त्या आउटलाइनचा AI द्वारे अभ्यास करून सॉफ्टवेअर इंटरनेटवरील लाखो इमेजेसमधून योग्य त्या इमेजेस निवडून त्यांना बरोबर जोडून आपल्यासमोर एक खराखुरा फोटो तयार करून देईल! थोडक्यात तुम्हाला कलरिंग बुकमध्ये ज्याप्रमाणे रंग भरले जातात तसेच रंग व रेषा काढायच्या आहेत आणि AI तुम्हाला त्याचा फोटो बनवून देईल तो सुद्धा कॅमेराने काढलेल्या खर्‍या फोटोसारखा!

GauGan मध्ये तीन टूल्स देण्यात आली आहेत. पेंट बकेट, पेन व पेन्सिल. यासोबत स्क्रीनवर खाली बर्‍याच गोष्टींना स्वतंत्र बटणे देण्यात आली आहेत ज्यापैकी पर्याय आपल्याला तयार करायच्या असलेल्या फोटोला साजेसा निवडून त्याचं चित्र रेषा काढून करायच आहे. उदा. ढग हवे असतील तर Cloud पर्याय निवडायचा आणि पेन्सिल द्वारे इच्छित ढगांचा आकार काढा, रंग भरा की झाले खरे ढग तयार! झाडाच्या आकाराच्या रेषा काढल्या की आपोआप शोभेल असं झाड त्या फोटोमध्ये जोडलेल दिसेल! न्यूरल नेटवर्क्स तुमच्या फोटोमध्ये आधीच असलेल्या गोष्टी पाहून त्याला साजेस रूप देत जातात.

GauGAN टेन्सर कम्प्युटिंग प्लॅटफॉर्मवर कार्य करतं. एनव्हीडियाने RTX Titan GPU वर या सॉफ्टवेअरचा डेमो दाखवला. या गोष्टींमुळे हे सॉफ्टवेअर रियल टाइम म्हणजे आज्ञा दिल्या क्षणीच काम करून स्क्रीनवर दाखवते! एनव्हीडियाने यासाठी फ्लिकरया प्रसिद्ध साईटवरील दहा लाख फोटोंचा वापर केला आहे.

GauGAN मधील GAN म्हणजे Generative Adversarial Network (GAN) असून Gau नाव फ्रेंच चित्रकाराच्या नावावरून देण्यात आलं आहे. मध्यंतरी आलेलं Prisma अॅपसुद्धा बर्‍यापैकी अशाच प्रकारे फोटोचा अभ्यास करून इफेक्ट्स देतं. आता एनव्हीडियाने आणखी एक पाऊल पुढे नेट स्वतःची कृत्रिम बुद्धिमत्तेमधील प्रगती जगासमोर आणली आहे. GauGAN लवकरच एनव्हीडियाच्या AI Playground वेबसाइटवर पाहायला मिळेल.

या सॉफ्टवेअरमुळे AI च्या मानवी आयुष्यावरील परिणामांबद्दल पुन्हा एकदा नव्याने चर्चा सुरू झाल्याचं पहायला मिळत आहे. डिजिटल युगात अशा गोष्टींचा गैरवापर होण्याचीच शक्यता डीपफेक्सच्या वेळी आपण सर्वांनी पाहिली आहेच. AI चा वापर चांगल्या गोष्टींसाठीच व्हावा यासंबंधी प्रयत्न होण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेवली आहे हे मात्र नक्की…

Exit mobile version