तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे का सांगण्यासाठी गूगलची सोय!

गूगलची क्रोम ब्राऊजरमध्ये पासवर्ड मॅनेजर नावाची सुविधा आहे जी आपणास आपले विविध वेबसाइट्सवरचे पासवर्ड्स साठवण्यात आणि ते परत लॉगिन करताना सहज वापरण्यात मदत करते. गूगलने या पासवर्ड मॅनेजरमध्ये पासवर्ड चेकअप नावाची सोय जोडत आहे जी तुम्ही सेट केलेला पासवर्ड, ईमेल कुठल्या साईट्स हॅक झाल्या असतील आणि त्यांचा डेटाबेस लीक झाला असेल तर त्यामध्ये आहे का हे सांगेल जेणेकरून तुम्ही तो पासवर्ड बदलू शकाल किंवा त्या साईटवरील अकाऊंट डिलिट करू शकाल. यासाठी आधी क्रोम एक्सटेन्शन देण्यात आलं होतं आता मात्र थेट गूगल अकाऊंट कंट्रोल्समध्ये पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे.खाली दिलेल्या वेबसाइटवर जाऊन Check Passwords वर क्लिक करा.

लिंक : passwords.google.com

याआधी घडलेल्या security breach सारख्या घटनांवेळी लिक झालेल्या डेटाबेसमध्ये आपला ईमेल आणि पासवर्ड आहे का हे तपासून लगेच आपण तो बदलणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा आपण एखाद्या साईटवर अकाऊंट सुरू करून सोडून देतो आणि परत कधी त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे टी साईट हॅक झाली की नाही हे आपल्याला समजत नाही. दरम्यान त्या वेबसाइटवरील यूजर डेटाबेस लिक होतो आणि समजा तुम्ही एकच पासवर्ड इतर ठिकाणीसुद्धा वापरला असेल तर तुम्ही इतर अकाऊंट्स सहज हॅक करता येऊ शकतात. म्हणून एकच पासवर्ड सगळ्या साइट्सना वापरू नका. सर्व ठिकाणी थोडा तरी बदल करून क्लिष्ट पासवर्ड्स सेट करा. याबद्दल अधिक माहितीसाठी आमचे खालील लेख वाचू शकता.

अशी सोय याआधी अनेकांनी उपलब्ध करून दिलेली आहे. गूगलची सेवा केवळ तुमच्या गूगल अकाऊंटला सेव्ह असलेल्या अकाऊंट्सचीच माहिती डेल. पुढे दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्ही सर्वच अकाऊंट्सबद्दल माहिती घेऊ शकाल. haveibeenpwned.com हा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणता येईल. साईटवर तुमचा ईमेल अॅड्रेस टाका आणि ती साईट लगेच तुम्हाला कोणकोणत्या साईट हॅक झाल्या त्यावेळी तुमचा ईमेल अॅड्रेस हॅकर्सच्या हाती लागला आहे ते दाखवेल! हॅव आय बीन पॉन्ड् सारखीच सोय फायरफॉक्सनेही उपलब्ध करून दिली आहे त्या सेवेचं नाव फायरफॉक्स मॉनिटर असं असून ती वापरण्यासाठी https://monitor.firefox.com या लिंकवर जाऊ शकता.

जर तुमचा ईमेल/पासवर्ड अमुक एका वेबसाइटच्या हॅक झालेल्या अकाऊंट्समध्ये असेल तर ताबडतोब त्या वेबसाइटवर जाऊन पासवर्ड बदला. तिथे पर्याय असेल तर द्विस्तर पडताळणी (2 Step Verification) सुरू करा. जेणेकरून पासवर्ड लीक झाला तरी हॅकर्सना पुन्हा तुमच्या अकाऊंटमध्ये शिरणं शक्य होणार नाही. शिवाय तुम्ही जर टी साईट परत कधी वापरळीच नसेल तर थेट अकाऊंट डिलिट करून टाकणंच उत्तम…

Exit mobile version