क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865, 765 प्रोसेसर सादर : आता फोन्समध्ये 5G तंत्रज्ञान!

Qualcomm Snapdragon Processors

क्वालकॉम (Qualcomm) कंपनीने त्यांचा २०२० च्या फ्लॅगशिप फोन्ससाठी फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 865 जाहीर केला असून अनेक बाबतीत (उदा. कामगिरी, गेमिंग, फोटोग्राफी, AI प्रोसेसिंग, इ) हा प्रोसेसर सध्याच्या प्रोसेसर्सच्या मानाने उत्कृष्ट ठरणार आहे. यासोबत Snapdragon 765 सुद्धा जाहीर केला असून हा पुढील वर्षी मध्यम किंमतीच्या फोन्समध्ये पाहायला मिळेल. विशेष म्हणजे यामध्ये Integrated 5G चिप असेल. यामध्ये 865 मध्ये असलेल्या X50 मोडेमपेक्षा कमी क्षमता असलेला X52 मोडेम जोडलेला आहे!

Snapdragon 865 मध्ये अनेक गोष्टी नव्या आणि सुधारित असणार आहेत. हा CPU आणि GPU या दोन्हीबाबत २५ टक्के अधिक उत्तम कामगिरी करणारा मोबाइल प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी या प्रोसेसरला बऱ्याच गोष्टींना आधीपासून सपोर्ट देण्यात येत असून हा प्रोसेसर चक्क 200 मेगापिक्सेलचे फोटो, 8K व्हिडिओ शूट करण्यास सपोर्ट देत आहे! शिवाय 960fps स्लो मो व्हिडिओ 720p HD रेजोल्यूशनमध्ये काढता येईल. Dolby Vision HDR सपोर्ट सुद्धा प्रथमच देण्यात आला आहे.
गेमिंगसाठी हा प्रोसेसर थेट 144Hz डिस्प्ले असलेले फोन सपोर्ट करेल. यामुळे गेमिंगवेळी रिफ्रेश रेट नेहमीच उत्तम पाहायला मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI बाबतीतसुद्धा दुपटीने चांगली कामगिरी करण्याची क्षमता यामध्ये आहे!

शिवाय प्रथमच फोनच्या GPU चे ड्रायवर्स प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असून यामुळे कम्प्युटर्सप्रमाणे मोबाइलच्या ग्राफिक्स ड्रायवर्सनासुद्धा अपडेट करून अधिक चांगला परफॉर्मन्स मिळवता येईल!

याच कार्यक्रमात क्वालकॉमने लॅपटॉप्ससाठीही नवे प्रोसेसर आणले असून Snapdragon 8c व 7c हे दोन प्रोसेसर पुढील वर्षीच्या लॅपटॉप्समध्ये पाहायला मिळतील. हे प्रोसेसर एकापेक्षा अधिक दिवस चालणारी बॅटरी लाईफ देत असून इंटेल किंवा AMD प्रोसेसर इतकी कामगिरी करू शकत नसले तरी अनेक दिवस चालणारी बॅटरी आणि 4G इंटरनेटमुळे हे लॅपटॉप लोकप्रिय होऊ शकतात. कमी वजन ज्यामुळे आकारही बारीक, फास्ट कामगिरी, AI सपोर्ट, फॅनची गरज नाही त्यामुळे आवाजही कमी, इन्स्टंट ऑन सोयीमुळे उघडताच चालू होईल अशा भन्नाट सुविधा मिळतील. यावर आधारित लॅपटॉप २०२० मध्ये येण्यास सुरुवात होईल.

Exit mobile version