यूट्यूब, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ क्वालिटी काही दिवस कमी करणार!

सध्या करोना व्हायरसच्या प्रसारास आळा घालण्यासाठी अनेक देशात संचारबंदी/जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे अनेक लोक घरबसल्या विविध ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवांवर वेगवेगळे चित्रपट, मालिका पाहण्याचा आनंद घेत आहेत. एकाचवेळी नेहमीपेक्षा अनेक लोक ही गोष्ट करू लागल्यामुळे जगभरातील नेटवर्क्सवर मोठ्या प्रमाणात लोड येत आहे. युरोपमध्ये तर सरकारी आदेशानुसार नेटफ्लिक्स, यूट्यूब, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ या स्ट्रीमिंग सेवांना त्यांच्या व्हिडिओची गुणवत्ता कमी करण्यास सांगण्यात आले आहे जेणेकरून इंटरनेट प्रोवायडर्सच्या नेटवर्कवरील लोड कमी होईल!

आजपासून यूट्यूबसुद्धा जगभरात त्यांच्या व्हिडिओचं रेजोल्यूशन कमी करण्यास सुरुवात करणार आहे. आता व्हिडिओ By Default 480p रेजोल्यूशनवर दिसतील. जर तुम्हाला एचडी पाहायचं असेल तर तुम्हाला स्वतःला तो पर्याय निवडावा लागेल. “आम्ही या अभूतपूर्व काळात सरकारी संस्था आणि नेटवर्क ऑपरेटर्ससोबत काम करत असून आमच्या तर्फे जागतिक सिस्टम्सवरील ताण कमी करण्यासाठी आमचं कर्तव्य पार पाडत आहोत” असं गूगलकडून सांगण्यात आलं आहे. यूट्यूबवरील हे कमी गुणवत्तेचं डिफॉल्ट सेटिंग ३० दिवस सुरू असेल अशी माहिती आहे.

अपडेट 30-03-2020 : यूट्यूब इंडियाने त्यांच्या मोबाइल अॅपवर व्हिडिओ रेजोल्यूशन आता 480p वर मर्यादित केलं आहे, यामुळे आणखी काही दिवस यूट्यूब अॅपवर तुम्ही एचडी व्हीडीओ पाहता येणार नाहीत. डेस्कटॉपवर सुद्धा हा बदल करण्यात आला आहे मात्र तुम्ही डेस्कटॉपवर पुन्हा एचडीचा पर्याय निवडू शकता.

नेटवर्कवरील लोड कमी करण्यासाठी सर्वात आधी नेटफ्लिक्सने पाऊल उचललं असून आधी युरोप व आता भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्या व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवेचा बिटरेट कमी करणार आहे. यामुळे व्हिडिओ गुणवत्तेत फारसा फरक न पडता नेटवर्क लोड कमी करता येईल! नेटफ्लिक्सचे अधिकारी केन फ्लोरान्स यांनी अशा प्रकारे कृती केल्यामुळे टेलीकॉम नेटवर्क्सवरील लोड तब्बल २५ टक्क्यांनी कमी झाला असून ग्राहकांना त्यांच्या प्लॅननुसार Ultra High, High किंवा Standard Definition यापैकी त्या त्या प्लॅन्सच्या ग्राहकांना चित्रपट/मालिका पाहणं सुरू ठेवता येईल!
याचा अर्थ गुणवत्तेवर विशेष फरक न पडता प्लॅनच्याच रेजोल्यूशनमध्येच चित्रपट/मालिका पाहता येतील!

आतापर्यंत भारतात नेटफ्लिक्स, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांनी या दृष्टीने पाऊल उचलल्याची माहिती आहे.

Exit mobile version