स्विगी, झोमॅटोसारख्या अॅप्सवरून किराणा मालाची डिलिव्हरी सुरू!

सध्या सुरू असलेला लॉकडाऊन आज जाहीर झालेल्या माहितीनुसार ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांअंतर्गत आपण किराणा माल आणण्यासाठी बाहेर पडू शकतो मात्र हे करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. यासाठी फुड डिलिव्हरी सेवा पुरवणाऱ्या स्विगी, झोमॅटोसारख्या अॅप्सनी किराणा मालाचीही ऑनलाइन डिलिव्हरी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी स्थानिक किराणा दुकानदारांशी भागीदारी केली आहे. यापूर्वी तुम्हाला बिगबास्केट किंवा ग्रोफर्स हे दोनच पर्याय होते. मात्र आता स्विगी, झोमॅटो, डॉमिनोज, फ्लिपकार्ट, पेटीएम, अॅमेझॉन यांनीही ही सेवा देण्यास बऱ्याच शहरात सुरुवात केली आहे.
या सेवांची उपलब्धता त्या त्या शहरावर अवलंबून आहे आणि या काही शहरात ठराविक वेळेतच उपलब्ध होतील याची नोंद घ्यावी.

याआधी काही ठराविक शहरातच उपलब्ध असणारी ही किराणा/घरगुती गोष्टी डिलिव्हर करण्याची सोय आता आणखी छोट्या शहरात सुद्धा वाढवण्यात आली आहे. स्विगी जवळपास १२५ शहरात तर झोमॅटो ८० शहरात अशा प्रकारे वस्तु पोहचवत आहे. स्विगीने यासाठी HUL, P&G, गोदरेज, डाबर,सिप्ला, इ. कंपन्यासोबत भागीदारी केली आहे. झोमॅटोने टाटा, अमूल, आयटीसी, एमटीआर, एव्हरेस्ट अशा कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

ही सेवा वापरण्यासाठी स्विगी किंवा झोमॅटो यापैकी अॅपवर जाऊन Grocery/Zomato Marketचा नवा पर्याय निवडा. तुम्हाला तुमच्यापासून जवळ असलेल्या किराणा दुकानाचं नाव दिसेल व तिथे उपलब्ध वस्तु दिसतील त्यापैकी हव्या आहेत त्या वस्तु निवडा. Add To Cart करा आणि ऑनलाइन पैसे द्या. दिलेल्या वेळेत वस्तु तुमच्या घरी पोहोचवल्या जातील! सध्या कोरोना प्रसाराचा धोका असल्याने तुम्ही No-contact/Contactless Delivery चा पर्याय निवडू शकता ज्यामुळे डिलिव्हरी बॉयसोबत येणारा थेट संपर्क टाळता येतो.

सध्या बऱ्याच शहरात या अॅप्सची सेवा मर्यादित स्वरूपात आल्याने यावर आयुष्य अवलंबून असणाऱ्या डिलिव्हरी बॉइजसाठी स्विगी व झोमॅटो मदत गोळा करत आहेत, शिवाय अनेकांना सध्या पोटभर जेवण मिळवणं सुद्धा मुश्किल आहे त्यांच्यासाठी मदत जमा करून त्यांना अन्न पोहोचवलं जात आहे. यामध्ये त्यांना इतर कंपन्या मदत करत आहेत.

Exit mobile version