कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अग्रगण्य असलेलं ChatGPT तयार करणारी कंपनी OpenAI ने आपले नवीन व्हिडिओ-ऑडिओ जनरेशन मॉडेल Sora 2 सादर केले आहे. हे मॉडेल आधीच्या तुलनेत अधिक realistic व्हिडिओ आणि तेसुद्धा आवाजासोबत तयार करू शकते. त्याचबरोबर यांनी एक नवीन अॅपही सादर केले आहे, ज्यामध्ये आपण AI व्हिडिओ बनवू शकतो आणि टिकटॉक/इंस्टाग्रामसारखं मित्रांमध्ये शेअर करू शकतो. नवं Sora अॅप AI सोशल मीडिया अॅप म्हणता येईल.
हे मॉडेल सध्या आघाडीवर असलेल्या गूगलच्या Veo 3 सोबत थेट स्पर्धा करणार आहे. ज्याप्रमाणे गूगलच्या नॅनो बनानाने गेले काही दिवस आपले स्वतःचे फोटो वापरुन AI इमेजेस बनवणं सोपं केलं होतं अगदी तसच मात्र आता आणखी अवघड असलेल्या व्हिडिओबाबत OpenAI ने Sora द्वारे केलं आहे. आपले किंवा मित्रांचे फोटो आपलोड करून काही प्रॉम्प्टद्वारे आपण आभासी जगात आपले स्वतःच्या AI क्लिप्स बनवून त्या रीमिक्स करून एकमेकांसोबत नवीन अॅपद्वारे शेयर करू शकतो.
AI इमेजेस आणि आता AI व्हिडिओ तयार करण्याचं हे तंत्रज्ञान सध्या प्रचंड वेगाने सुधारणा करत पुढे सरकत आहे. व्हिडिओ जनरेशन मनोरंजन, शिक्षण, जाहिरात अशा कामासाठी मोठे बदल घडवू शकते. याची सुरुवात आता आपण पहिली असेल किंवा लवकरच येणाऱ्या सणांच्या निमित्ताने येणाऱ्या जाहिरातींमध्ये पुन्हा दिसून येईलच…
OpenAI च्या माहितीनुसार Sora 2 मध्ये असलेल्या नव्या गोष्टी
- आता व्हिडिओमध्ये आवाज, बोलणे आणि साऊंड इफेक्टस एकत्र तयार करता येतात.
- दृश्ये (Scenes) अधिक नैसर्गिक वाटतात – पाण्यावर तरंगणे, बास्केटबॉल खेळातील हालचाली, प्रकाशाचा परावर्तित होणारा परिणाम यांसारख्या गोष्टी खऱ्या वाटतील.
- चुका झाल्या तरी त्या खऱ्या जगात कशा घडतात, तशाच दिसतात.
- वापरकर्त्याला एखाद्या प्रसंगाचा वेगवेगळ्या शॉट्समध्ये सीनच्या पुढचा भाग तयार करता येतो.
- अॅनिमे, चित्रपट शैली, कार्टून यांसारख्या विविध शैलींमध्ये व्हिडिओ तयार करता येतील.
- स्वतःचा चेहरा किंवा आवाज व्हिडिओत समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- आपण तयार करत असलेल्या व्हिडिओमध्ये मित्रांनाही समाविष्ट करता येईल.
Sora by OpenAI App Download Link : https://apps.apple.com/us/app/sora-by-openai/id6744034028
नवीन अॅपसह अनुभव
- OpenAI ने यासाठी एक iOS मोबाईल अॅप सुरू केले आहे हे नंतर अँड्रॉइडवरही उपलब्ध होईलच.
- Sora iOS अॅप सध्या अमेरिका आणि कॅनडा येथे उपलब्ध आहे. पुढे इतर देशांतही उपलब्ध होणार आहे.
- सध्या Invite Only मोड मध्येच उपलब्ध असेल.
- OpenAI ने असे सांगितले आहे की अॅपमध्ये doomscrolling (अनावश्यक स्क्रोल करत करत कंटेंट पाहत राहणे) आणि व्यसन वाढू नये म्हणून उपाय केले आहेत.
AI इमेजेस/व्हिडिओज् मध्ये जरी थोड्याफार प्रमाणात चुका आत्ता दिसून येत असल्या तरी काही महिन्यांपूर्वीच्या AI जनरेशन्स आणि आत्ता आत्ताच्या रिजल्ट्समध्ये अनेक पटींनी सुधारणा झाली आहे आणि आता पुढेही AI वर काम करणाऱ्या कंपन्यामधील स्पर्धेमुळे यामध्ये बरेच बदल दिसून येतील.