व्हॉट्सअॅपची मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा!

कोरोना व्हायरससंबंधित बरीच खोटी माहिती मेसेजिंग अॅप्स मार्फत पसरत आहे. कुठे जंगलातील जडीबुटीचं औषध आहे, कुठे वेगळाच आजार झालेल्या व्यक्तीचा व्हिडीओ करोनाचा म्हणून पाठवला जात आहे, कुठे इटलीच्या रस्त्यांवर हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत, इ अनेक खोट्या गोष्टी किंवा वेगळ्या कारणासाठी चित्रित केलेले व्हिडीओ कोरोनाचे म्हणून पसरवण्यात येत आहेत. अशा प्रकारांमुळे लोकांमध्ये अजूनच भीती वाढत जाते. ह्यावर उपाय म्हणून व्हॉट्सअॅपने आता मेसेज फॉरवर्ड करण्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून Highly Forwarded (बऱ्याच वेळा पाठवले गेलेले) संदेश जे पाच किंवा अधिक लोकांच्या साखळीमधून गेले आहेत असे मेसेज आता फक्त एकाच व्यक्तीला फॉरवर्ड करता येतील. यामुळे खोटी माहिती पसरण्याचा वेग कमी होईल असं व्हॉट्सअॅपला वाटतं…

व्हॉट्सअॅपने जाहीर केलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, “आम्हाला ठाऊक आहे की अनेक यूजर्स उपयोगी माहितीसह मजेशीर व्हिडीओ, मीम्स, त्यांना अर्थपूर्ण वाटणारे विचार किंवा प्रार्थना फॉरवर्ड करत असतात. अलीकडील आठवड्यांमध्ये, अग्रभागी काम करणाऱ्या आरोग्य दक्षता कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याकरिता ते कशी सेवा देतात याचे प्रत्यक्ष क्षण दाखवण्यासाठी देखील लोक WhatsApp वापरत आहेत. पण आजकाल आम्हाला मेसेजेस फॉरवर्ड केल्या जाण्याच्या प्रमाणात भरपूर वाढ झाल्याचे दिसत आहे, ज्याविषयी वापरकर्त्यांनी आम्हाला सांगितले आहे की असे मेसेज वाचून लोक भारावून जाऊ शकतात आणि ज्यामुळे चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते. वैयक्तिक संवाद साधण्याचे एक ठिकाण म्हणून WhatsApp ला टिकवून ठेवण्यासाठी या मेसेजेसचे प्रसारण कमी करणे महत्त्वाचे असल्याचे आम्हाला वाटते.”

व्हॉट्सअॅपद्वारे एक मेसेज एकावेळी जवळपास २५६ लोकांना फॉरवर्ड करू शकायचो. WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरणारे सर्व वापरकर्ते एकावेळी केवळ पाच जणांनाच संदेश फॉरवर्ड करू शकतात. आता यापैकी अनेक ठिकाणी फिरलेल्या मेसेजवर forwarded असं लिहलेलं दिसून येतं. End to End एनक्रिप्शनमुळे आता सरकारी संस्थांनाही कोणता मेसेज कुठून आधी पाठवण्यात आला ही सांगणं अवघड झालं आहे. याचाच गैरफायदा घेत काही लोक समाजात अस्थिरता पसरवतात. अशावेळी व्हॉट्सअॅपला एक कंपनी म्हणून पावले उचलावीच लागतील.

सध्या केंद्र व राज्य सरकारतर्फे व्हॉट्सअॅपवर सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवांद्वारे मिळालेलीच माहिती अधिकृत व खरी असणार आहे. व्हॉट्सअॅपवर इतर माध्यमातून मिळालेल्या कोरोना/COVID-19 च्या माहितीवर अजिबात विश्वास ठेऊ नका.

खालील क्रमांक तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा आणि या क्रमांकावरून कोरोना विषाणू व त्यासंबंधीत प्रश्न व त्यांची उत्तरे चॅटबॉटद्वारे मिळवा.

भारत सरकार (केंद्र) : 9013151515
महाराष्ट्र सरकार (राज्य) : +912026127394

Exit mobile version