Android 11 अपडेट उपलब्ध होण्यास सुरुवात : अनेक नवे पर्याय !

काल गूगलने जाहीर केलेल्या माहितीनुसार Android 11 हे अँड्रॉइडचं लेटेस्ट व्हर्जन आता उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये बरेच नवे पर्याय जोडण्यात आले असून आपला फोन वापरण्याचा अनुभव अधिक सुरक्षित व चांगला होईल याकडे जास्त लक्ष देण्यात आलं आहे. आता संभाषण (Conversations) साठी खास जागा देण्यात आली असून प्रायव्हसीसाठीही अधिक पर्याय आले आहेत.

हे बदल दिसून येण्यासारखे नसतील त्यामुळे अँड्रॉइडच्या युजर इंटरफेस दृष्टीने पाहायचं तर Android 11 मध्ये फारसं नवीन काही नाही. नवं अपडेट आता गूगलच्या पिक्सल फोन्सवर (Pixel 2 व त्यानंतरच्या) उपलब्ध झालं असून लवकरच वनप्लस (OnePlus 8 & 8 Pro, ओप्पो (Oppo Find X2 & Reno 3), रियलमी (Realme X50 Pro) आणि शायोमी (Mi 10 & 10 Pro) च्या काही ठराविक फोन्सवर उपलब्ध झालेलं असेल.

गूगलने आजवर त्यांच्या लोकप्रिय मोबाइल ऑपरेटिंग सिस्टिमच्या विविध आवृत्त्यांची नावे डेझर्ट्सवरून ठेवली होती. उदा. कपकेक, डोनट, फ्रोयो(2.0), जिंजरब्रेड(2.3), हनीकोंब (3.0), आईसक्रीम सँडविच(4.0), जेली बीन(4.1), किटकॅट(4.4), लॉलीपॉप(5.0), मार्शमेलो(6.0), नुगट(7.0), ओरीओ(8.0), पाय(9.0) नंतर Android 10 आणि आता नव्या आवृत्तीचं अधिकृत नाव Android 11 असं असणार आहे.

New Power Menu

Android 11 मधील काही ठळक सुविधा

Conversations : हे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. आपण वापरत असलेल्या विविध मेसेजिंग अॅप्सना एकच जागी आणून त्यांच्या नोटिफिकेशन्स एकत्रच दिसतील. यामुळे कुणाला प्राधान्य देऊन संभाषण पुढे सुरू ठेवायचं ते सहज समजेल.कामाच्या ठिकाणी असाल तर त्यासंबंधी मेसेजेस आधी दिसतील मग नेहमीचे मेसेजेस दिसतील.

Bubbles : याद्वारे फेसबुकप्रमाणे मेसेजेससाठी चॅट बबल दिसेल. सुरू असलेली गोष्ट तशीच ठेऊन आपण कोपऱ्यात मेसेजेस पाहू शकाल

Redesigned media controls : ऑडिओ नियंत्रित करण्यासाठीचे पर्याय आता नव्याने डिझाईन करण्यात आले असून आता हे अधिक सोप्या पद्धतीने करता येईल.

New Power Menu : आता पॉवर बटन होल्ड करताच दिसणाऱ्या नेहमीच्या पर्यायाऐवजी पूर्ण नवे पर्याय दिसतील. याद्वारे तुम्ही स्मार्ट होम उपकरणे सुद्धा नियंत्रित करू शकाल.

Built-in screen recording : होय आता अँड्रॉइडमध्ये स्वतःचा स्क्रीन रेकॉर्डिंग पर्याय देण्यात आला आहे. आजवर तुमच्या फोन कंपनीने दिलेला किंवा प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलेला पर्याय वापरावा लागायचा मात्र आता अँड्रॉइडतर्फेच ही स्क्रीन रेकॉर्ड करण्याची सोय देण्यात आली आहे.

Updates : आता अँड्रॉइडचे सेक्युरिटी अपडेट्स सुद्धा गूगलतर्फे थेट मिळणार असून प्ले स्टोअरमध्ये Apps अपडेट करतो त्याप्रमाणेच हे अपडेट्ससुद्धा सहज करता येणार आहेत!

Exit mobile version