व्हॉट्सॲपला भारतीय पर्याय ‘Sandes’ : सरकारतर्फे आता मेसेजिंग ॲप!

भारत सरकारने पूर्वी फक्त काही सरकारी कर्मचाऱ्यांपुरतं मर्यादित असणारं संदेस (Sandes) ॲप आता सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे. हे ॲप व्हॉट्सॲप सारखा भारतीय पर्याय म्हणून तयार करण्यात आलं असून हे आता अँड्रॉइड व iOS दोन्ही ठिकाणी उपलब्ध झालं आहे.

Sandes App Download Link : https://www.gims.gov.in/dash/dlink

हे संदेस ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरमध्ये (NIC) तयार करण्यात आलं आहे. अँड्रॉइड ॲप वापरताना याचं नाव GIMS (Government Instant Messaging System) असं दिसून येत आहे. हे चुकून झालं आहे की नंतर नावात बदल करण्यात येणार आहे याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. अजूनही या वेबसाइटवर बरीचशी पेजेस पाहण्यासाठी authorized government officials असाल तरच पाहता येतील असे निर्बंध आहेत! हे ॲप ऑगस्ट २०२० मध्ये आणण्यात आलं होतं मात्र आजवर ते सरकारी कर्मचाऱ्यांपुरतंच मर्यादित होतं आता ते सर्वांना वापरता येत आहे.

हे ॲप अँड्रॉइडसाठी गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. तुम्हाला apk फाइल डाउनलोड करून स्वतः इंस्टॉल करावं लागेल. iOS साठी मात्र हे App Store वर उपलब्ध आहे!

यामध्ये आपण एखादा मेसेज महत्वाचा आहे असं सांगू शकता. त्यानुसार टॅग देण्याची सोय या ॲपमध्ये आहे. सरकारी कामासाठी ही सोय नक्कीच उपयोगी पडेल. कारण सरकारी कामांसाठीही अजूनसुद्धा व्हॉट्सॲपसारखे खासगी पर्याय वापरले जातात जे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतं.

मात्र सामान्य यूजर्सना हे ॲप फारसं उपयोगी पडेल असं वाटत नाही. सध्या सर्वच गोष्टींना भारतीय पर्याय देण्याची स्पर्धा निर्माण झाली असली तरी गुणवत्तेने चांगले, सुरक्षित, उत्तम डिझाईन असलेले, नावीन्य असलेले ॲप्स यापैकी कोणीच करत नाही. त्यामुळे त्यांची चर्चाच सुरू होते ते अमुक ॲपची भारतीय कॉपी म्हणून… या गोष्टीमध्ये बदल होऊन खरेच चांगले भारतीय पर्याय बाजारात उपलब्ध व्हावेत जे जगभर वापरले जातील.

Exit mobile version