यूट्यूब आता नव्या रूपात उपलब्ध : डिझाईनमध्ये बरेच बदल!

यूट्यूबने गेल्या काही दिवसात त्यांच्या नव्या डिझाईनची चाचणी सुरू केली होती आणि आता हे नवं डिझाईन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यामध्ये प्रमुख नवी सोय म्हणजे Ambient Mode म्हणता येईल. सोबत इतरही नवे बदल असून ज्यामुळे आपल्याला यूट्यूब वेबसाइट, ॲप वापरणं अधिक सोयीस्कर आणि डोळ्याना कमी त्रास होईल असं होणार आहे. सोबत नेहमीच्या व्हिडिओसाठी आणि शॉर्ट्स व लाईव्हसाठी स्वतंत्र टॅब केल्या आहेत.

Ambient Mode : या नव्या मोडमुळे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओमधील रंगांची छटा आपल्या व्हिडिओ प्लेयरच्या बाजूने फिकट स्वरूपात दिसेल. यासाठी डार्क मोड ऑन असावा लागेल.

Pinch to Zoom : आता आपण फोटो झूम करतो त्या प्रमाणे व्हिडिओसुद्धा झुम करून पाहू शकता. याद्वारे तुम्ही चक्क 8x झुम करू शकता आणि व्हिडिओमधील ठराविक भाग मोठा करून पाहू शकता. हा पर्याय यूट्यूब ॲपमध्ये फुलस्क्रीन व्हिडिओ पाहत असतानाच वापरता येईल.

Precise seeking : यामुळे आपल्याला व्हिडिओ पुढे मागे ढकलत असताना त्यामधील फ्रेम्स/थंबनेल्स दिसतील. प्रोग्रेस बारवरील हव्या असलेल्या जागीच व्हिडिओ पाहण्यासाठी नवी सोय नक्कीच वेळ वाचवणारी असेल.

Rounded Thumbnails & buttons : यूट्यूबवरील सर्व थंबनेल्स आणि बटन्स आता बाजूने गोलाकार असतील. आता हा डिझाईन ट्रेंड झाला असून राऊंडेड कॉर्नरमुळे पाहताना डोळ्याना कमी त्रास होतो किंवा तो कंटेंट पाहणं सोपं होतं आणि त्याना मॉडर्न लुक सुद्धा मिळतो.

Subscribe button updates : सबस्क्राईब बटनलासुद्धा नवं रूप देण्यात आलं असून पूर्वीच्या फक्त लाल रंगात उपलब्ध असलेल्या बटनऐवजी नव्या डिझाईननुसार खास रंग देण्यात आले आहेत.

Darker Dark theme : डार्क थीममध्ये आता आणखी डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आला असून यामुळे व्हिडिओ पाहत असताना आपल्या फोनची बॅटरी आणखी काही प्रमाणात वाचेल.

Playlist design updates : व्हिडिओ/गाण्यांची प्लेलिस्टसुद्धा आता नव्या रूपात दिसणार आहे. अधिक मोठं टायटल, गोलाकार बटन्स असे काही बदल यामध्ये पाहू शकता.

यूट्यूबवर आता नेहमीच्या व्हिडिओसाठी आणि शॉर्ट्स व लाईव्हसाठी स्वतंत्र टॅब देण्यात आल्या असून यामुळे चॅनल पाहत असताना होणारी सरमिसळ थांबेल. Videos टॅबवर जास्त लांबीचे व्हिडिओ, Shorts टॅबवर कमी लांबीचे उभे व्हिडिओ आणि Live टॅबमध्ये जुने लाईव्ह केलेले व्हिडिओ दिसतील.

Exit mobile version