इंटेलचे सहसंस्थापक गॉर्डन मूर यांचं निधन : Moore’s Law चे निर्माते

सेमीकंडक्टर क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात महत्वाचा सहभाग असलेले इंटेल कंपनीचे सहसंस्थापक Gordon Moore यांचं २४ मार्चला हवाई येथे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झालं. आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटर्सच्या विकसित होण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. यासंबंधीत Moore’s Law चं आपण कधीतरी ऐकलं असेलच, त्याचं श्रेयसुद्धा गॉर्डन मूर यांनाच जातं!

१९६५ मध्ये त्यांनी असं भाकीत केलं की प्रोसेसरमधील ट्रांजिस्टर्सची संख्या दरवर्षी दुप्पट होत जाईल. त्यानंतर एक दशक उलटल्यावर (१९७५) त्यांनी त्यामध्ये बदल करून तीच गोष्ट दर दोन वर्षांनी असं होईल असं सांगितलं. यालाच नंतर Moore’s Law म्हटलं गेलं. त्यानंतर अगदी अलीकडच्या काही वर्षांपर्यंत त्यांचं ते भाकीत खरं ठरत गेलं. काही जणांनी तर सिलिकॉन व्हॅलीची ओळख Moore’s Law मुळे तयार झाली असंही म्हटलं आहे.

१९६८ मध्ये Moore व Robert Noyce यांनी मिळून Integrated Electronics नावाची कंपनी काढली. हीच कंपनी पुढे intel (इंटेल) नावाने जगप्रसिद्ध झाली. ते स्वतः नंतर चेयरमन व सीईओपदी बसले आणि आठ वर्षं हे पद त्यांनी भूषवलं. इंटेल आजतागायत प्रोसेसर निर्मितीमध्ये जगातली एक आघाडीची कंपनी आहे. त्यांच्या प्रोसेसर्सनी वेळोवेळी कॉम्प्युटर क्षेत्रात क्रांती म्हणता येईल इतका बदल घडवून आणला आहे.

त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात The Gordon and Betty Moore foundation या तब्बल ६ बिलियन डॉलर्स ची ग्रँट असलेल्या सामाजिक, शैक्षणिक आणि विज्ञान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या कार्यात वाहून घेतलं. गेल्या वर्षी इंटेलने त्यांच्या सन्मानार्थ ओरेगॉन येथील कार्यालयाला Gordon Moore Park असं नाव देऊन उद्घाटन केलं होतं.

त्यांच्या निधनाबद्दल आयटी व तंत्रज्ञान क्षेत्रातील टीम कुक, सुंदर पिचाई अशा नामांकित व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version