ChatGPT च्या OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमनची हकालपट्टी (अपडेट : आता पुन्हा सीईओ)

OpenAI चे सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना त्यांनी स्वतःच सुरू केलेल्या कंपनीमधून आज कंपनीच्या बोर्ड मेंबर्सनी काढून टाकलं असून बोर्डसोबत संवाद साधताना सातत्याने अस्पष्टता दिसून येत होत्या आणि त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या क्षमतेत अडथळा निर्माण होत आहे असं सांगितलं आहे!

सिलिकॉन व्हॅलीमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेली कंपनी OpenAI मध्ये असा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. सॅम ऑल्टमनला काढल्यानंतर आता Greg Brockman जो OpenAI चा प्रेसिडेंट आणि सहसंस्थापक आहे त्यानेसुद्धा राजीनामा दिला आहे!

OpenAI बोर्डने प्रकाशित केलेली पोस्ट

आता Mira Murati यांची तात्पुरत्या सीईओ म्हणून नेमणूक झाली आहे. सोशल मीडियावर त्या भारतीय वंशाच्या असल्याचे गैरसमज पसरले असून खरेतर त्या अल्बानिया देशात जन्मलेल्या आहेत. सध्या त्या CTO पदावर होत्या

काही जणांच्या म्हणण्यानुसार सॅम ऑल्टमनने त्यांच्या नव्या प्रॉडक्टसमध्ये सुरक्षितता न तपासता जास्तीत जास्त प्रॉडक्ट उपलब्ध करून देण्यामुळे कंपनीमधील कर्मचारी आणि पर्यायाने बोर्ड सदस्य नाराज झाले आहेत. GPT Store जाहीर केल्यानंतर याबद्दल कंपनीत अंतर्गतरित्या मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली असंही सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे सध्या OpenAI मध्ये मायक्रोसॉफ्टची मोठी गुंतवणूक असून त्यांच्यासोबत काहीतरी मतभेद झाल्यामुळे त्यांनीच सॅम ऑल्टमनला काढायला लावलं किंवा मायक्रोसॉफ्टच हा प्रकाराला कारणीभूत आहे असंही सांगितलं जात आहे. यावर दुसऱ्या काही बातम्यामध्ये असंही सांगितल आहे की सॅम ऑल्टमनला काढण्याबद्दल मायक्रोसॉफ्टला केवळ काही मिनिटे आधीच माहिती देण्यात आली त्यामुळे यात त्यांचा काही सहभाग नाही!

येत्या काही दिवसात कदाचित याबद्दल नेमकी खरी माहिती बाहेर येईल पण एव्हढया मोठ्या कंपनीमध्ये असा प्रकार तोसुद्धा अचानक घडल्यामुळे संपूर्ण टेक विश्वात आज याचीच चर्चा सुरू झाली आहे.

Sam Altman, Elon Musk, Greg Brockman (ex Stipe), Ilya Sutskever (ex Google), Trevor Blackwell, Vicki Cheung, Andrej Karpathy, Durk Kingma, Jessica Livingston, John Schulman, Pamela Vagata आणि Wojciech Zaremba यांनी मिळून २०१५ साली OpenAI ची स्थापना केली होती.

त्यावेळी इलॉन मस्कचासुद्धा या कंपनीत सहभाग होता. नंतर इलॉन मस्क बाहेर पडला मात्र अजूनही त्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे. यासोबत, Reid Hoffman (LinkedIn co-founder), Peter Thiel (PayPal co-founder), Jessica Livingston (founding partner of Y Combinator), भारतीय आयटी कंपनी इन्फोसिस यांनी गुंतवणूक केली होती. २०१९ मध्ये १ बिलियन डॉलर्सची आणि नंतर २०२३ मध्ये १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक मायक्रोसॉफ्टने या कंपनीत केली होती.

अपडेट : सॅम ऑल्टमनला परत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू असून OpenAI च्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांचा सपोर्ट दर्शवला आहे. या निर्णयाबाबत मायक्रोसॉफ्टलासुद्धा अंधारात ठेवलं गेलं होतं आणि त्यामुळं सत्या नाडेलासुद्धा रागावले असल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्व बोर्ड बरखास्त केलं तर परत सॅम परतण्याची शक्यता आहे.

अपडेट 2 : सॅम ऑल्टमनची OpenAI बोर्डसोबतची चर्चा पुन्हा फिस्कटली असून आता Emmett Shear यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती झाली आहे!

अपडेट 3 (20 Nov 2023 1:23PM) : आता सत्या नाडेला यांनी केलेल्या ट्विट (एक्सवरील पोस्ट)नुसार सॅम ऑल्टमन, Greg Brockman आणि त्यांचे इतर सहकारी आता मायक्रोसॉफ्टच्या नव्या AI Research Team चा प्रमुख बनणार आहे! शिवाय मायक्रोसॉफ्टची OpenAI सोबतसुद्धा भागीदारी सुरूच राहणार आहे!

एकंदरीत बरीच उलथापालथ झाली असून मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेला यांनी सॅम ऑल्टमनला OpenAI मध्ये परत घेण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसत आहे मात्र OpenAI च्या बोर्डसोबत चर्चा फिस्कटल्याने आता हे सर्वजन आता थेट मायक्रोसॉफ्ट नवी AI रिसर्च टीम तयार करून ती सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वात चालवली जाणार आहे. सत्या नाडेलांनी यामुळे मायक्रोसॉफ्टचं कोणतंही नुकसान होणार नाही अशी खेळी खेळली आहे.

Exit mobile version