व्हॉट्सॲप चॅट बॅकअप आता गूगलच्या 15GB स्टोरेज मर्यादेमध्ये मोजला जाणार!

सध्या व्हॉट्सॲपवर आपण आपला चॅट बॅकअप तुमच्या गूगल अकाऊंटला लिंक केला असेल तर त्यामध्ये साठवला जाणारा डेटा तुम्हाला गूगलतर्फे मिळणाऱ्या मोफत 15GB स्टोरेजमध्ये मोजला जात नाही. त्यामुळे आत्ता ही सेवा अमर्याद व्हॉट्सॲप चॅट बॅकअप देते असं म्हणता येईल. मात्र लवकरच हा सेवेमध्ये बदल करून व्हॉट्सॲप अँड्रॉइड चॅट बॅकअप गूगल अकाऊंटच्या 15GB स्टोरेजमध्येच मोजले जाणार आहेत! अनेकांचा चॅट बॅकअप बऱ्यापैकी जास्त साईज असलेला आहे आणि त्यांना यामुळे अडचण होऊ शकते.

तुमच्या गूगल अकाऊंट स्टोरेजमध्ये सध्या जीमेल, गूगल फोटोज, गूगल ड्राईव्ह अशा सर्व सेवांद्वारे साठवला जाणारा डेटा मोजला जातो.

तुमचा फोन हरवला किंवा बिघडला तर तुमचे व्हॉट्सॲप चॅट पुन्हा मिळवण्यासाठी हे चॅट बॅकअप महत्वाचे असतात. याची एक कॉपी तुमच्या फोनमध्ये आणि दुसरी कॉपी गूगल अकाऊंट लिंक केलं असेल तर त्यामध्ये साठवली जाते. सध्या समजा तुमच्या चॅट बॅकअपची साईज 7GB झाली असेल तर ती तुमच्या गूगल अकाऊंटला असणाऱ्या 15GB मर्यादेत मोजली जात नाही.

पण आता हा नवा बदल झाल्यावर मात्र हेच 7GB तुमच्या गूगल अकाऊंट मर्यादेत येईल आणि उदाहरणार्थ जर तुमचा जीमेल, ड्राइव्ह आणि गूगल फोटोजचा एकूण डेटा 11GB भरला असेल तर त्या हे 7GB व्हॉट्सॲप चॅट बॅकअप जोडलं गेलं की एकूण 18GB होईल आणि तुम्हाला मोफत मिळणारं 15GB मर्यादेच्या वर जाईल. अशावेळी तुम्हाला तुमचा डेटा काढून त्यामध्ये जागा करावी लागेल अन्यथा तुम्हाला नवे इमेल्स येणार नाहीत आणि नवीन डेटा त्यामध्ये स्टोर करता येणार नाही!

Google One Plans
Google One Plans in India

गूगलची एक Google One नावाची सोय असून यामध्ये आपण महिन्याला १३० रुपये मोजून 100GB स्टोरेज घेऊ शकतो. यामुळे स्टोरेज 15GB + 100GB असे होईल आणि मग बॅकअपची काळजी उरणार नाही आणि गूगलने यामार्फत अधिकचं उत्पन्न मिळवण्यासाठीच हा नवा बदल केला असावा. कारण व्हॉट्सॲपच्या सुरुवातीच्या काळापासून हा क्लाऊड बॅकअप मोफतच होता. मात्र आता बऱ्याच जणांना यावर पैसे द्यावे लागतील अन्यथा त्यांचा डेटा डिलिट करून जागा मोकळी करावी लागेल!

सुरुवातीला एखादी सेवा मोफत देऊन त्याची ग्राहकांना सवय लावून नंतर त्यासाठी पैसे मोजायला सुरू करणे यामध्ये आता हे नवं उदाहरण जोडलं जाईल. ज्यांचं व्हॉट्सॲप चॅट बॅकअप साईज जास्त आहे त्यांना Google One चं सबस्क्रीप्शन घ्यावंच लागेल.


व्हॉट्सॲप या बदलाबद्दल खालील माहिती दिली आहे

  1. हा बदल डिसेंबर २०२३ पासून बीटा वापरकर्त्यांसाठी रोल आउट होईल आणि २०२४ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये सर्व व्हॉट्सॲप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी हळूहळू रोल आउट होईल.
  2. हा बदल होण्याच्या ३० दिवस आधी व्हॉट्सॲप सेटिंग्ज > चॅट्स > चॅट बॅकअप यामध्ये बॅनरद्वारे तुम्हाला सूचित करू.
  3. तुम्हाला तुमच्या गूगल खात्यावर चॅट्सचा बॅकअप घ्यायचा नसेल, तरीही तुम्ही WhatsApp चॅट ट्रान्सफर वापरून अँड्रॉइड डिव्हाइसेसदरम्यान तुमची चॅट्स ट्रान्सफर करू शकता.
    ते कसे करावे हे https://faq.whatsapp.com/209942271778103 येथे जाणून घ्या.

काही महत्वपूर्ण लिंक्स

Exit mobile version