गूगलचं ChatGPT ला उत्तर : Bard नावाचा AI चॅटबॉट!

OpenAI कंपनीने बनवलेल्या ChatGPT ची वाढत चाललेल्या लोकप्रियतेची धास्ती घेऊन गूगलनेसुद्धा त्यांचा विचारलेल्या प्रश्नांना समजून घेऊन AI द्वारे उत्तर देणारं मॉडेल आणलं असून याची चाचणी आता सुरू झाली आहे. OpenAI मध्ये मायक्रोसॉफ्टने केलेली मोठी गुंतवणूक आणि त्यानंतर ChatGPT ला त्यांच्या Bing या सर्च इंजिनमध्ये जोडणार असल्याची घोषणा ही गूगलसाठी नक्कीच त्यांच्या भविष्याची काळजी वाटेल अशी होती.

अपडेट : गूगलने Bard चं नाव आता बदललं असून याचं नवं नाव Gemini असं असणार आहे! https://gemini.google.com/app

आता त्यावर उत्तर म्हणून त्यांच्या LaMDA (Language Model for Dialogue Applications) या प्रत्यक्ष संवादाप्रमाणे संभाषण करू शकणाऱ्या AI मॉडेलचा वापर करून Bard नावाची सेवा तयार केली आहे. सध्या काही मोजक्या ठराविक टेस्टर्सना याचा ॲक्सेस देण्यात आला असून सर्वाना वापरण्यासाठी ही सेवा येत्या काही आठवडयात उपलब्ध होऊ शकते. आजच्या या बार्डच्या घोषणेबद्दल स्वतः गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीच ब्लॉग पोस्टमार्फत माहिती दिली आहे.

ChatGPT मधील उत्तरे २०२१ पर्यंतच्याच माहितीवर आधारित असून त्याला इंटरनेटसोबत जोडण्यात आलेलं नाही मात्र गूगल त्यांच्या बार्डला वेबवरील सर्च रिजल्ट्सवरून माहिती उपलब्ध करून देत असल्यामुळे यामधील उत्तरे नव्या माहितीवर आधारित असू शकतील!

लवकरच गूगलसुद्धा त्यांच्या सर्च रिजल्ट्समध्ये त्यांच्या LaMDA, PaLM, Imagen, MusicLM अशा AI तंत्रज्ञानाचा वापर करून विचारलेल्या प्रश्नांना अभ्यास करून तिथेच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. उदा. सध्याच्या गूगलमध्ये पियानोमध्ये किती कीज् असतात असे प्रश्न विचारल्यावर तशी माहिती असलेल्या वेबसाइट्सवर घेऊन जातो. मात्र आता पियानो शिकणं सोपं आहे की गिटार आणि दोन्हीसाठी किती वेळ लागेल असे प्रश्न विचारल्यावरसुद्धा स्वतः त्याची माहिती AI मार्फत मिळवून उत्तरे देऊ शकेल!

मायक्रोसॉफ्टच्या बिंगला प्रसिद्धीच्या वाटेवर जाण्याला गूगलने आणलेल्या या नव्या सेवांमुळे पुन्हा एकदा सुरुंग लागू शकतो. अर्थात अशा कंपन्यांची स्पर्धा असणं युजर्ससाठी नक्कीच एक चांगली गोष्ट आहे ज्यामुळे अधिकाधिक सुधारणा व सोयी असलेल्या सेवा मिळू शकतील.

Exit mobile version