शायोमी वापरकर्त्यांचा डेटा आता भारतातल्या सर्व्हरवरच साठवणार!

शायोमी (Xiaomi) इंडियाने आज घोषणा केली आहे की भारतीय वापरकर्त्यांच्या सर्व डेटा आता भारतातच लोकल सर्व्हरवर स्थलांतरित केला जाणार आहे. यामध्ये शायोमीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील डेटा, Mi कम्युनिटी, Mi क्लाऊड यांचा समावेश आहे. सोबतच MIUI अंतर्गत येणाऱ्या शायोमी मार्केट, फीड, Mi व्हिडिओ, advertising, Mi मेसेजिंग, पुश नोटिफिकेशन्स इत्यादी) त्याचबरोबर Mi TV यांवरील सर्व डेटा स्थलांतरित केला जाईल (होय एवढ्या साऱ्या गोष्टींमधून तुमचा डेटा गोळा केला जातो). MIUI च्या नावाखाली शायोमीकडून बराच डेटा बाहेरच्या सर्व्हर्सवर पाठवला जातो. मध्यंतरी हा डेटा चीनमध्ये पाठवला जाण्यावरून वादंग निर्माण झाले होते! मात्र आता फोन्ससुद्धा भारतात बनवून डेटा भारतात स्टोर केला जाईल!       

वापरकर्त्यांच्या हा सर्व डेटा अमॅझॉन वेब सर्विसेस (AWS) आणि मायक्रोसॉफ्ट Azure च्या सर्व्हरवर साठवला जाईल. या वर्षाच्या अखेरीपर्यंत हा सर्व डेटा भारतात स्थलांतरित केला जाईल. १ जुलै पासूनचा सर्व डेटा आधीपासूनच भारतातील सर्व्हरवर ठेवण्यास सुरवात झाली आहे तर mi.com/in वरील डेटा सप्टेंबर २०१८ पर्यंत स्थलांतरित केला जाईल.

भारतात हा डेटा पाठविण्याआधी तो सिंगापुर आणि US मधील AWS सर्व्हरवर साठविला जात होता. हा डेटा लोकल सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चरवर स्थलांतरित झाल्यानंतर वापरकर्त्यांना ऍक्सेस स्पीड मध्ये चांगला फरक जाणवेल.

काही दिवसांपूर्वी RBI ने सुद्धा भारतातील पेमेंट सिस्टिम डेटा भारतातच साठवला जावा असे परिपत्रकाद्वारे कळविले होते. याची मुदत १५ ऑक्टोंबर २०१८ रोजी समाप्त होत आहे. लवकरच शायोमी भारतात Mi Pay ची सुविधा सुरू करणार आहे जी गूगल पे आणि व्हॉट्सअॅप पेमेंट्स सोबत स्पर्धा करेल!

Exit mobile version