Tag: Book Fair

प्रादेशिक भाषांतील ई-बुक

टेक्नोलॉजीच्या जमान्यात वाचन - लेखन आणि इतर अनेक बाबींमधील तंत्रेच बदलली . टेक्नोक्रांती झाल्यामुळे काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले . प्रत्यक्षात आता कुणीही कागदावर हाताने फारसे लिहित नाही . त्याची गरजच उरलेली नाही . पुस्तकांच्या बाबतीत ही छापील पुस्तकाची जागा ' ई - बुक ' घेऊ लागले आहे  दिल्लीमध्ये सुरू असलेल्या जागतिक पुस्तक मेळाव्यातही ' ई - बुक ' ची दखल घेतली गेली . एक वेगळा विभाग 'ई - बुक ' च्या प्रकाशकांसाठी , निर्मात्यांसाठी ठेवण्यात आला होता . कम्प्युटर , इंटरनेटबरोबरच स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध झाली . सुरुवातीला इंग्रजी भाषेपुरतेच मर्यादित असणारे हे क्षेत्र आता जवळपास सर्व भाषांमध्ये विस्तारले आहे . स्मार्टफोन , आयफोन , अन्ड्रॉइड यांसारख्या फोनवर अनेक अॅप्लिकेशन्स आहेत .त्यात आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तके डाउनलोड करण्याच्या अॅप्लिकेशनची भर पडणार आहे . टॅबलेट आणि मोबाइलसाठी ई - बुक आणि ई - मॅगझिन्स पुरवणाऱ्या ' रॉकस्टँड ' या कंपनीने दिल्लीतील जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांच्या पहिल्या संचाचे अनावरण केले आहे . यामुळे प्रादेशिक भाषांमधील ई - पुस्तकेही फोनवर वाचता येणार आहेत . विविध प्रकाशनांची इंग्रजी पुस्तके ' ई - बुक 'वर उपलब्ध आहेत . आता प्रादेशिक भाषांमधील पुस्तकांची मागणी यामुळे वाढणार आहे . केवळ ' प्रिंट कॉपीं 'च्या विक्रीवर होणाऱ्या नफ्याची गणिते आता केव्हाच मागे पडली आहेत . ' अॅन्ड्रॉइड ' वर एका अॅप्लिकेशनद्वारेही पुस्तके डाउनलोड करता येतील . ' रॉक असाप रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ' चे संस्थापक संचालक प्रवीण राजपाल यांनी या अॅप्लिकेशनची माहिती दिली . ते म्हणाले , ' हिंदी , गुजराती , मराठी यांसारख्या प्रादेशिक भाषांमधील पुस्तके यामुळे सर्वांना मिळणारआहेत . एकूण १८ भाषांमध्ये आम्ही पुस्तके प्रसिद्ध करत आहोत .' यासाठी अॅन्ड्रॉइड फोनवर एक अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल . हे अॅप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येईल . डाउनलोड केलेले पुस्तक कायमस्वरूपी वापरता येईल . इंटरनेट अॅक्सेस नसला , तरी डाउनलोड केलेले पुस्तक वाचता येणार आहे . नाइट रीडिंग मोड ,फॉण्ट साइजमध्ये बदल करणे , पुस्तक वाचताना नोट्स काढण्याची सोय यांसारखी वैशिष्ट्ये या अॅप्लिकेशनमध्ये आहेत . एवढेच नव्हे , तर वाचायचा आपल्याला कंटाळा आला , तर वाचून दाखवण्याची सोय या अॅपमध्ये आहे .पुस्तक डाउनलोड करण्याची किंमत ही छापील पुस्तकाच्या किमतीपेक्षा फार कमी आहे . सर्वांत स्वस्त पुस्तक हे 'चाचा चौधरी कॉमिक बुक ' असून पुस्तकाची किंमत केवळ एक रुपया आहे . कंपनीने नुकतेच देशातील पन्नास प्रकाशकांशी ' टाय - अप ' केलेले आहे . विविध भाषांमधील आणखी एक हजार पुस्तके त्यामुळे कंपनीच्या संग्रहात दाखल झाली आहेत . सध्या ' रॉकस्टँड ' कडे वीस लाख पुस्तके आहेत . आर्थिक फायद्यांबरोबरच वाचनसंस्कृती वाढीला लागावी हा या बदलत्या आणि प्रगतीशील तंत्रज्ञानाचा उद्देश आहे . हेसर्वांनी लक्षात घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर वाचून समृद्ध होण्यासाठी करावा . 

ADVERTISEMENT
error: Content is protected!