ॲपलने अनेक दिवस चर्चा सुरू असलेलं त्यांचं नवं उपकरण Apple Vision Pro सरतेशेवटी आज सादर केलं असून सध्या हे जगातलं सर्वाधित चर्चेत असलेली गोष्ट बनलं आहे. हे ॲपलचं पहिलंच VR उपकरण असून याद्वारे आपण आभासी जग आणि वास्तविक जग यांचा मिलाफ अनुभवू शकता.
Vision Pro हा एक हेडसेट असून हा डोक्यावर घालून त्यामधील स्क्रीनद्वारे अनुभवायचा आहे. यामध्ये असलेले अनेक सेन्सर्स आणि कॅमेरा यांचा वापर करत आपण यामधील मेन्यू, फोटो-व्हिडिओ, ॲप्स वापरू शकतो. यासाठी त्यांनी खास visionOS तयार केली आहे.
Vision Pro पूर्णपणे VR किंवा पूर्णपणे AR प्रकारचं उपकरण नाही. तरी हे VR प्रकारचंच उपकरण म्हणता येईल कारण थेट वास्तविक जगातील गोष्टी डोळ्यांना यामध्ये दिसत नाहीत. आपल्याला यामधील कॅमेराद्वारे वास्तविक जग स्क्रीनवर दिसतं.
यामध्ये दोन ultra-high-resolution डिस्प्ले, 3D कॅमेरा, R1 chip, Spatial Audio system, २ कॅमेरा, पाच सेन्सर्स आणि सहा मायक्रोफोन्स जोडलेले आहेत.
याची किंमत $3,499 (जवळपास ३ लाख रुपये) असून हा पुढच्या वर्षी अमेरिकेत उपलब्ध होईल त्यांनंतर इतर देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
काही दिवसांपूर्वीच मेटा कंपनीने त्यांचा Quest 3 हा हेडसेट जाहीर केला होता. मेटा कंपनीचे हेडसेट सध्या VR जगात सर्वाधिक प्रमाणात वापरले जातात. यासोबत सोनी प्लेस्टेशन VR, मायक्रोसॉफ्ट होलोलेन्स सुद्धा उपलब्ध आहेत. मात्र ॲपलचा यामध्ये बऱ्यापैकी चांगलं डिझाईन आणि सॉफ्टवेअर तयार केल्यामुळे कदाचित त्यांच्या हेडसेटला जास्त यश मिळू शकेल.