जर तुम्ही गेल्या काही दिवसांत तुमचे मोबाईल अॅप्स किंवा वेब ब्राऊझर बार बारकाईने पाहिले असतील, तर तुम्हाला गुगलच्या अॅप्समध्ये काहीतरी वेगळेपण जाणवले असेल. गूगलने अधिकृतपणे त्यांच्या लोकप्रिय गूगल वर्कस्पेस (Google Workspace) अॅप्सचे आयकॉन्स पूर्णपणे बदलले आहेत.
२६ मे २०२६ रोजी गूगलने या मोठ्या डिझाईन बदलाची घोषणा केली. गुगलच्या मते, हा बदल त्यांच्या ‘जेमिनी एरा’ (Gemini Era) म्हणजेच एआय युगातील एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे.
२०२० मध्ये गुगलने आपल्या सर्व अॅप्ससाठी चार रंगांची (निळा, लाल, पिवळा आणि हिरवा) एकसारखी आऊटलाईन असलेली डिझाईन आणली होती. पण, युजर्सची नेहमी एकच तक्रार असायची की, मोबाईल स्क्रीनवर सगळे अॅप्स एकाच सारखे दिसतात, त्यामुळे नेमके कोणते अॅप उघडायचे ते समजत नाही! आता गुगलने लोकांची ही अडचण दूर केली आहे. आता सपाट (Flat) टाइपच्या डिझाईनमधील आयकॉन्स ऐवजी ग्लॉसी आणि थ्रीडी लुक (Glossy Gradients) असलेल्या नवीन आयकॉन्स आल्या आहेत. अँड्रॉइड १७ (Android 17) मध्ये येणाऱ्या नव्या थ्रीडी इमोजी स्टाईलसारखाच हा काहीसा लुक आहे.
कोणत्या १४ अॅप्सचे आयकॉन्स बदलले?
Gmail, Calendar, Chat, Meet, Drive, Docs, Slides, Sheets, Keep, Forms, Sites, Tasks, Vids, Voice.
तुम्हाला हे नवीन आयकॉन्स कधी दिसणार?
या नव्या आयकॉन्सचा रोलआऊट १९ मे २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झाला आहे. गुगलने स्पष्ट केले आहे की, हा एक ‘एक्सटेंडेड रोलआऊट’ आहे. याचा अर्थ असा की, सर्व युजर्सच्या मोबाईलवर आणि कॉम्प्युटरवर हे बदल पूर्णपणे दिसण्यासाठी जून २०२६ च्या मध्यापर्यंतचा वेळ लागू शकतो. त्यामुळे, जर तुमच्या सहकाऱ्याच्या फोनवर नवीन Gmail चा आयकॉन दिसत असेल आणि तुमच्या फोनवर अजूनही जुनाच असेल, तर काळजी करू नका; येत्या काही दिवसांत तुमच्याही फोनवर अॅप अपडेट उपलब्ध होईल!
तुम्हाला गुगलचा हा नवीन लुक कसा वाटला? जुनी डिझाईन बरी होती की ही नवीन डिझाईन जास्त आवडली?







