टेक जगतात ज्याची गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती, तो सॅमसंगचा Galaxy XR हेडसेट अखेर सादर झाला आहे. हा एक साधा हेडसेट नसून, एआयवर चालणारं एक नवीन उपकरण आहे. सॅमसंगने गूगल आणि क्वालकॉम यांच्यासोबत मिळून हा हेडसेट बनवला आहे, जो ‘अँड्रॉइड एक्सआर’ (Android XR) प्लॅटफॉर्मवर चालणारा पहिलाच हेडसेट असेल. याची किंमत अमेरिकेत 1799 डॉलर्स (~१,५८,००० रुपये) असून सध्यातरी भारतात उपलब्ध होणार की नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही.
गॅलेक्सी एक्सआर हेडसेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे ‘मल्टीमोडल एआय’ (Multimodal AI) हे आहे. हा हेडसेट गूगलच्या जेमिनी एआय सोबत येतो, ज्यामुळे तो तुमचा एक एआय Companion बनतो. तुम्ही फक्त बोलूनच नाही, तर तुमच्या हाताच्या इशाऱ्यांनी आणि डोळ्यांच्या हालचालींनी (eye-tracking) सुद्धा याला कंट्रोल करू शकता. यात दोन हाय-रिझोल्यूशन ‘पास-थ्रू’ कॅमेरे आहेत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे खरे जग अगदी स्पष्ट दिसते.
तुम्ही या खऱ्या जगावरच डिजिटल माहिती पाहू शकता, जसे की गूगल मॅप्सवर रस्ता पाहणे किंवा ‘सर्कल टू सर्च’ वापरून समोरच्या कोणत्याही वस्तूची माहिती मिळवणे. हा ‘अँड्रॉइड एक्सआर’ (Android XR) प्लॅटफॉर्मवर चालत असल्यामुळे, भविष्यात यावर अनेक नवीन ॲप्स आणि गेम्स उपलब्ध होतील, जे या हेडसेटला अधिक उपयुक्त बनवतील. आत्ताच अँड्रॉइड फोन्ससाठी उपलब्ध असणारे बऱ्यापैकी सर्वच ॲप्स Galaxy XR वर वापरता येतील!
एक्सआर म्हणजे काय? : एक्सआर म्हणजे एक्सटेंडेड रिॲलिटी (Extended Reality). यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि ऑगमेंटेड रिॲलिटी (AR) या दोन्ही तंत्रज्ञानाचा समावेश होतो. म्हणजेच, तुम्ही तुमच्या समोर डिजिटल गोष्टी पाहू शकता आणि त्यांच्यासोबत संवाद साधू शकता, जसे की त्या तुमच्या खऱ्या जगातच आहेत. गूगलने या तंत्रज्ञानासाठी अँड्रॉइडची आवृत्ती आणली असून तिचं नाव Android XR असं आहे. यामध्ये अँड्रॉइडसोबत गूगलच्या सेवांमध्ये काही खास सोयी जोडल्या आहेत.

सॅमसंगने या हेडसेटमध्ये अनेक नवीन आणि शक्तिशाली वैशिष्ट्ये दिली आहेत:
- जबरदस्त एआय (AI): या हेडसेटमध्ये गूगलचे ‘जेमिनी’ (Gemini) एआय मॉडेल थेट सिस्टीममध्येच दिले आहे. यामुळे हा हेडसेट फक्त तुमच्या कमांड्स ऐकत नाही, तर तुमच्या आजूबाजूचे जग पाहून, आवाज ऐकून तुम्हाला मदत करणारा एक ‘एआय सोबती’ म्हणून काम करतो. तुम्ही बोलून, हातवारे करून किंवा डोळ्यांच्या हालचालीने त्याच्याशी संवाद साधू शकता.
- उत्कृष्ट डिस्प्ले: यात 4K Micro OLED डिस्प्ले आहे, ज्यामुळे रंग आणि स्पष्टता खूपच अप्रतिम दिसते. याचं रिझोल्यूशन (3,552 x 3,840) इतका जास्त आहे की तुम्हाला सर्वकाही खऱ्या जगासारखे वाटेल.
- शक्तिशाली प्रोसेसर: हा हेडसेट Snapdragon® XR2+ Gen 2 या नवीन प्रोसेसरवर चालतो, जो खास एक्सआर उपकरणांसाठी बनवला आहे.
- डिझाइन आणि आराम: हेडसेटचे वजन ५४५ ग्रॅम आहे आणि त्याची बॅटरी वेगळी (३०२ ग्रॅम) असल्याने तो वापरताना खूप आरामदायक वाटतो.
- कॅमेरा आणि सेन्सर्स: यात दोन हाय-रिझोल्यूशन कॅमेरे आहेत ज्यातून तुम्ही बाहेरचे जग स्पष्ट पाहू शकता (पास-थ्रू). तसेच, यात सहा ट्रॅकिंग कॅमेरे, चार आय-ट्रॅकिंग (डोळ्यांच्या हालचाली टिपणारे) कॅमेरे आणि एक डेप्थ सेन्सर आहे.
- ॲप्स: यावर सर्व अँड्रॉइड ॲप्स थेट चालतात. तसेच गूगल मॅप्स, यूट्यूब आणि सर्कल-टू-सर्च यांसारखे ॲप्स खास या हेडसेटसाठी ऑप्टिमाईज केले आहेत.
सध्या उपलब्ध असलेल्या काही खास VR/AR हेडसेट्ससोबत Galaxy XR ची तुलना
| वैशिष्ट्ये | गॅलेक्सी एक्सआर (Galaxy XR) | ॲपल व्हिजन प्रो (Apple Vision Pro) | मेटा क्वेस्ट ३ (Meta Quest 3) |
|---|---|---|---|
| तंत्रज्ञान | अँड्रॉइड एक्सआर (AI-Native) | स्पेसियल कॉम्प्युटिंग | मिक्स्ड रिॲलिटी (Mixed Reality) |
| प्रोसेसर | Snapdragon XR2+ Gen 2 | Apple M2 & R1 | Snapdragon XR2 Gen 2 |
| डिस्प्ले | 4K Micro OLED | 4K Micro OLED | LCD |
| नियंत्रण | डोळ्यांनी, हातांनी, आवाजाने (AI) | डोळ्यांनी, हातांनी, आवाजाने | हातांनी, कंट्रोलर्स, आवाजाने |
| किंमत (USD) | $1,799.99 | $3,499 | $499 |
| प्रमुख वैशिष्ट्य | गूगल एआय (Gemini) सह अँड्रॉइड इकोसिस्टम | ॲपल इकोसिस्टम, उत्कृष्ट पास-थ्रू | गेमिंग आणि परवडणारी किंमत |
याची थेट स्पर्धा ॲपलच्या Vision Pro आणि काही प्रमाणात Meta Quest 3 यांच्यासोबत असेल. सॅमसंगच्या Galaxy XR ची किंमत Apple Vision Pro च्या निम्मी आणि Meta Quest 3 च्या जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे दोन्हीच्या मध्ये बसणारा हा नवा पर्याय असणार आहे.










